24 November 2017

News Flash

अव्वल भारती एअरटेल अखेर पिछाडीवर

देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी अस्तित्वात

व्यापार प्रतिनिधी, मुंबई | Updated: March 21, 2017 1:15 AM

गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला सोमवारी मुंबईत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पूर्णविराम देण्यासाठी एकत्र आलेले आयडिया सेल्युलरच्या मुख्य प्रवर्तक आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला व व्होडाफोन समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विट्टोरिओ कोलाओ.

आयडिया-व्होडाफोन विलिनीकरण शिक्कामोर्तबानंतर देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी अस्तित्वात

ब्रिटिश दूरसंचार समूहातील भारतीय व्यवसायाच्या खरेदीवर अखेर शिक्कामोर्तब करत आयडिया सेल्युलरने मोबाईलधारकांच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बनण्याचा आपला मार्ग सोमवारी मोकळा केला.

गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेली याबाबतची चर्चा सोमवारी उभय कंपन्यांच्या मुंबईतील पत्रकार परिषदेच्या रूपात अंतिम टप्प्यात आली. भांडवली बाजारात सूचिबद्ध आयडिया सेल्युलरच्या मुख्य प्रवर्तक आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला व व्होडाफोन समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विट्टोरिओ कोलाओ हे यावेळी तमाम माध्यमांना सामोरे गेले.

भारतात सध्या भारती एंटरप्राईजेसची भारती एअरटेल ही सर्वाधिक ग्राहकसंख्येसह क्रमांक एकवर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर व्होडाफोन आहे. त्या पाठोपाठ आयडिया सेल्युलरचा क्रम लागतो. दोन मोठय़ा कंपन्यांच्या विलिनीकरणामुळे प्रथम एकच्या भारती एअरटेलचे स्थान मागे पडले असून समभागांच्या रूपात झालेले हे विलिनीकरण २३.२ अब्ज डॉलरचे असल्याचे मानले जाते.

व्होडाफोनच्या एकत्रिकरणामुळे आयडिया सेल्युलर ही ग्राहकसंख्या तसेच महसुली उत्पन्नाबाबत देशातील अव्वल कंपनी म्हणून पुढे आली आहे. एकत्रिकरणानंतर ३९.५१ कोटी ग्राहक आयडियाचे असतील. बाजारहिस्सा ३५.०६ टक्के होणार आहे. हे प्रमाण सध्याच्या भारती एअरटेलच्या तुलनेत अधिक आहे.

विलिनीकरणानंतर दोन्ही कंपन्यांवरील कर्ज भार एकूण १.०७ लाख कोटी रुपयांचा असेल. व्होडाफोन इंडिया सध्या सरकारच्या कर तगाद्याचा सामना करत आहे.

पुढील दोन वर्षांत विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होणार असून तूर्त नव्या व्यवसायाचे अध्यक्षपद बिर्ला यांच्याकडेच राहणार आहे. नव्या कंपनीत व्होडाफोनचा सुरुवातीला ४५.१ टक्के तर आयडियाचा २६ टक्के हिस्सा असेल. तूर्त दोन्ही कंपन्या स्वतंत्र म्हणून कार्यरत राहतील, असेही यानिमित्ताने स्पष्ट करण्यात आले आहे.

रिलायन्स – एअरसेलला मंजुरी

रिलायन्स कम्युनिकेशन्स व एअरसेलच्या विलिनीकरणाला भारतीय स्पर्धा आयोगाने मंजुरी दिली. रिलायन्स – अनिल धीरुभाई अंबानी समुहातील रिलायन्स कम्युनिकेशन्सने सप्टेंबर २०१६ मध्ये एअरसेलच्या खरेदीचा प्रस्ताव सर्वप्रथम जाहीर केला होता. या दोहोंची एकत्रित मालमत्ता आता ६५,००० कोटी रुपयांची होणार आहे. या विलिनीकरणाला भांडवली बाजार नियामक सेबी तसेच प्रमुख भांडवली बाजारांची परवानगी यापूर्वीच मिळाली आहे. या व्यवहारामुळे रिलायन्स व एअरसेलचा कर्जभार अनुक्रमे २०,००० कोटी रुपये व ४,००० कोटी रुपयांनी कमी होणार आहे. यामुळे देशात तिसरी मोठी दूरसंचार कंपनी अस्तित्वात येणार आहे.

आयडिया आपटला; ,६९२ कोटींचा ऱ्हास

व्होडाफोनबरोबरच्या विलिनीकरण मंजुरीनंतर भांडवली बाजारात सूचिबद्ध आयडिया सेल्युलरचा समभाग सोमवारी तब्बल १० टक्क्य़ांनी आपटला. नफेखोरी करण्याच्या दृष्टीने गुंतवणूकदारांनी हे समभाग विकण्याचे धोरण अनुसरले. यामुळे कंपनीचे बाजार भांडवल एकाच सत्रात तब्बल ३,६९२ कोटी रुपयांनी रोडावले. विलिनीकरणाची चर्चा जानेवारीपासून सुरू झाल्यानंतर शुक्रवापर्यंत आयडिया सेल्युलरचे मूल्य तब्बल ४० टक्क्य़ांहून अधिक उंचावले होते.

रु. ९७.६०-१०.३० -९.५५%

सोमवारचा किमान/कमाल

रु. ९२.००/रु.१२३.७५

वर्षभराचा किमान/कमाल

रु. ६६.००/रु.१४९.०५

 

धाडसी निर्णय : सीओएआय

व्होडाफोन-आयडियाच्या विलिनीकरणाबाबत सोमवारी पार पडलेला निर्णय हा धाडसी असल्याची प्रतिक्रिया मोबाईल कंपन्यांचे नेतृत्व करणाऱ्या ‘सीओएआय’ने दिली आहे. संघटनेचे महासंचालक राजन मॅथ्यूज यांनी म्हटले आहे की, या विलिनीकरणाचा लाभ अप्रत्यक्षरित्या सरकार तसेच ग्राहकांनाही होईल. या विलिनीकरणामुळे दूरसंचार क्षेत्रातील सुलभ व्यवसायाचे पर्व सुरू होईल.

 

First Published on March 21, 2017 1:15 am

Web Title: idea vodafone india announcer merger