मागणीप्रमाणे कंपन्यांकडून ७,२४८.७८ कोटींचा भरणा

नवी दिल्ली : दूरसंचार क्षेत्रातील आयडिया आणि व्होडाफोन या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणाला असलेला केंद्र सरकारचा अडसर अखेर दूर होण्याच्या मार्गावर आहे. उभय कंपन्यांनी सरकारने मागणी केल्याप्रमाणे ७,२४८.७८ कोटी रुपये जमा करण्याची तयारी दर्शविली आहे.

हे विलिनीकरण मार्गी लावायचे तर केंद्रीय दूरसंचार विभागानेच ही रक्कम आधी भरण्याची पूर्वअट उभय कंपन्यांवर घातली होती. काहीशा नाराजी आणि विरोध नमूद करीतच कंपन्यांनी अखेर ही रक्कम जमा केली आहे.

सरकारकडे जमा करावयाच्या एकूण रकमेपैकी ३,९२६.३४ कोटी रुपये रोखीने जमा करण्यात आले असून उर्वरित ३,३२२.४४ कोटी रुपये हे बँक हमी म्हणून मान्य करण्यात आले आहे. आयडिया सेल्युलरने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. रक्कम जमा होत नाही तोपर्यंत विलीनीकरणाला मंजुरी मिळणार नाही, असे दूरसंचार विभागाने यापूर्वी स्पष्ट केले होते.

एकत्रित नव्या कंपनीत व्होडाफोनचा ४५.१ टक्के तर आदित्य बिर्ला समूहाचा २६ टक्के आणि समूहातीलच आयडिया सेल्युलरच्या भागधारकांचा २८.९ टक्के हिस्सा असेल.

आयडिया-व्होडाफोनच्या एकत्रीकरणानंतर ४३ कोटी ग्राहकसंख्येद्वारे देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी अस्तित्वात येणार आहे. ३५ टक्के बाजारहिश्शासह उभय कंपन्यांची एकत्रित मालमत्ता १.५० लाख कोटी रुपये होणार आहे. यामुळे भारती एअरटेलचे भारताच्या दूरसंचार क्षेत्रात ग्राहकसंख्येतील अव्वल स्थान धोक्यात आले आहे.