आयडीएफसी लिमिटेडच्या भागधारकांनी प्रस्तावित आयडीएफसी बँकेत कंपनीच्या सर्व वित्तीय उपक्रमांच्या विलयास दिलेल्या मंजुरीने या बँकेच्या कार्यान्वयनातील सर्व सोपस्कारांची पूर्तता झाली आहे. नवागत आयडीएफसी बँकेचे विधिवत येत्या १ ऑक्टोबरपासून निवडक शाखांद्वारे कार्यारंभाचे सूतोवाचही करण्यात आले. तसेच विद्यमान आयडीएफसीच्या भागधारकांना प्रत्येक समभागाच्या बदल्यात आयडीएफसी बँकेच्या एका समभागाची बक्षिसीही मिळणार आहे.
मद्रास उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार आयडीएफसी लिमिटेडच्या भागधारकांची गुरुवारी सायंकाळी बोलावण्यात आलेल्या बैठकीत संपूर्ण सहमतीने आयडीएफसी बँकेच्या कार्यान्वयासंबंधी प्रस्तुत करण्यात आलेल्या रूपांतरण आराखडय़ाला मंजुरी देण्यात आली. रिझव्‍‌र्ह बँकेने सार्वत्रिक बँक म्हणून आयडीएफसीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या सर्व वित्तीय सेवा उपक्रम – म्युच्युअल फंड, आयडीएफसी सिक्युरिटीज् आणि आयडीएफसी इन्फ्रास्ट्रक्चर डेट फंड हे नव्या आयडीएफसी बँकेच्या अंतर्गत विलयास मंजुरी देणारा ठराव केला होता. मूळ पालक कंपनी आयडीएफसी लिमिटेड ही नियमाप्रमाणे धारक कंपनी (नॉन-ऑपरेटिंग फायनान्स होल्डिंग कंपनी) म्हणून अस्तित्वात राहील.

भागधारकांसाठी शुभसंकेत
गुरुवारच्या भागधारकांच्या सभेत मंजुरी मिळालेल्या रूपांतरण आराखडय़ानुसार, विद्यमान आयडीएफसीच्या भागधारकांना १:१ या प्रमाणात विलयित रूपातील नवीन आयडीएफसी बँकेचे समभाग लवकरच निश्चित केल्या जाणाऱ्या तारखेला (रेकॉर्ड डेट) प्राप्त होणार आहेत. बँकेचा कार्यारंभ येत्या १ ऑक्टोबरपासून निवडक २० शाखांद्वारे सुरू होत असल्याचे कंपनीकडून अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आले असून, त्याच दरम्यान आयडीएफसी बँकेचे समभाग शेअर बाजारात सूचिबद्धही केले जाणे अपेक्षित आहे. विद्यमान भागधारकांना प्राप्त होणारे आयडीएफसी बँकेचे समभाग हे बक्षीस समभाग (बोनस) रूपातच असतील आणि नवीन बँक ज्या वेगाने आपला व्यवसाय व नफाक्षमतेत वृद्धीची कामगिरी करून दाखवेल तितके या समभागांचे नजीकच्या काळात मूल्यवर्धनही संभवेल, असा विश्लेषकांचा कयास आहे.
भागधारकांकडून मिळालेल्या हिरव्या कंदिलाचे आयडीएफसीच्या समभागामध्ये शुक्रवारी बाजारात झालेल्या व्यवहारात सकारात्मक प्रतिबिंब उमटताना दिसले. कंपनीच्या समभागातील उलाढाल सरासरीच्या तुलनेत शुक्रवारी लक्षणीय वाढलेली दिसली. ‘एनएसई’वर समभागाने कालच्या तुलनेत ३.९० रुपयांची भर घालत १७६.२० स्तरावर विश्राम घेतला.