01 October 2020

News Flash

आयडीएफसीचा बँक स्थापनेचा मार्ग निर्धोक

पायाभूत सेवा क्षेत्रासाठी वित्त पुरवठा करणाऱ्या आघाडीच्या आयडीएफसी लिमिटेडला बँक व्यवसाय सुरू करण्यासाठीचा अंतिम परवाना अखेर प्राप्त झाला आहे.

| July 25, 2015 07:17 am

पायाभूत सेवा क्षेत्रासाठी वित्त पुरवठा करणाऱ्या आघाडीच्या आयडीएफसी लिमिटेडला बँक व्यवसाय सुरू करण्यासाठीचा अंतिम परवाना अखेर प्राप्त झाला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने याबाबत हिरवा कंदील दाखविल्यानंतर बँकेचे प्रत्यक्ष कामगार १ ऑक्टोबरपासून सुरू होईल. बँक २० शाखांच्या माध्यमातून या व्यवसायाला प्रारंभ करेल.
तिसऱ्या फळीतील नव्या बँकिंग परवान्यासाठी आयडीएफसी लिमिटेड व बंधन फायनान्शिअल या दोनच वित्तसंस्था पात्र ठरल्या होत्या. पैकी बंधनने २३ ऑगस्टपासून व्यवसायास प्रारंभ करण्याचे जाहीरही केले आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते बँकेच्या कोलकता येथील मुख्यालयी तिचा शुभारंभ होईल. बँकेच्या बोधचिन्हासह संचालक मंडळही पंधरवडय़ापूर्वीच जारी करण्यात आले.
बँकिंग नियामक कायदा, १९४९ च्या कलम २२ (१) अंतर्गत रिझव्‍‌र्ह बँकेकडून आयडीएफसी बँक लिमिटेडला गुरुवारी बँक परवाना मान्य झाल्याची माहिती आयडीएफसीने मुंबई शेअर बाजाराला कळविली आहे. स्पर्धेत आयडीएफसी, बंधनसह २५ कंपन्या, उद्योगांनी परवान्यासाठी एप्रिल २०१४ मध्ये अर्ज केला होता. मात्र अवघ्या दोघांनाच मान्यता देण्यात आली. पैकी बंधनला गेल्याच महिन्यात अंतिम परवाना प्राप्त झाला.
आयडीएफसी लिमिटेडची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या ३० जुलै रोजी होत आहे. यामध्ये बँकेच्या आगामी प्रवासाबाबतचे चित्र कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष राजीव लाल हे अधिक स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
प्राथमिक ५५,००० कोटी रुपयांच्या कर्ज तरतुदीनुसार, आयडीएफसी बँक व्यवसायास १ ऑक्टोबरपासून प्रारंभ करेल. बँकेच्या प्रमुख पहिल्या टप्प्यात २० शहरांमध्ये शाखा असतील. बँकेसाठी आतापर्यंत ६०० मनुष्यबळ जोडण्यात आल्याचे कळते.
देशभरातील प्रमुख शहरांमध्ये २२ शाखांपासून बँकेच्या व्यवसायाची सुरुवात होण्याचीची चर्चा आहे. त्यात, मुंबई, दिल्ली, बंगळुरु, कोलकता, अहमदाबाद आदी शहरांचा समावेश असण्याची शक्यता आहे. मध्य भारतात शाखांचे जाळे अधिक असेल.

परवान्याच्या वृत्तानंतर मुख्य प्रवर्तक आयडीएफसी लिमिटेडचा समभाग मुंबई शेअर बाजारात ३.५९ टक्क्य़ांपर्यंत उसळत १५८.८५ रुपयांपर्यंत गेला. सत्रात तो तब्बल ६.६१ टक्क्य़ांनी झेपावत १६३.५० रुपयांवर पोहोचला होता. यामुळे कंपनीची बाजारमत्ताही दिवसअखेर ६३२.१४ कोटी रुपयांनी वाढून २५,०७२.१४ कोटी रुपये झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2015 7:17 am

Web Title: idfc get bank license from rbi
टॅग Business News,Rbi
Next Stories
1 फोर्ब्स आशिया यादीत १० भारतीय कंपन्या अव्वल
2 ब्रिक्स बँकेचे पहिले कर्ज चिनी चलनात वितरित होणार
3 रिझव्‍‌र्ह बँक गव्हर्नरांच्या अधिकारांवर गदा
Just Now!
X