News Flash

बँक व्यवसायासाठी आयडीएफसी सज्ज

तब्बल दशकानंतर खुला झालेला परवाना मिळवून देशाच्या खासगी बँक क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी आयडीएफसी लिमिटेड सज्ज झाली आहे

नवे बोधचिन्ह, संचालक मंडळ जाहीर

देशभरात २३ शाखांसह सुरुवात
दीड कोटी ग्राहकसंख्येचे लक्ष्य
तब्बल दशकानंतर खुला झालेला परवाना मिळवून देशाच्या खासगी बँक क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी आयडीएफसी लिमिटेड सज्ज झाली आहे. आकर्षक रंगातील बोधचिन्ह व वित्त क्षेत्रातील गाढा अनुभव असलेल्या धुरीणांच्या जोरावर आयडीएफसी बँकेचा व्यवसाय येत्या १ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.
पायाभूत सेवा क्षेत्रातील वित्तपुरवठय़ाचा तब्बल दोन दशकांचा अनुभव असलेल्या आयडीएफसी लिमिडेटचे परिपूर्ण आयडीएफसी बँकेत रूपांतर होत असून उर्वरित चालू अर्धवार्षिकात बँकेच्या देशभरातील ४० शाखांचे उद्दिष्ट राखण्यात आले आहे.
मुख्य प्रवर्तक आयडीएफसी लिमिटेडचे ४०० ग्राहक/कंपन्या असून कंपनीचा ताळेबंद ७० हजार कोटी रुपयांच्या पुढे आहे. नव्या बँकेचा ग्रामीण क्षेत्रासाठी व्यवसाय हिस्सा हा १५,००० कोटी रुपयांचा असेल. बँकेत मूळ आयडीएफसी लिमिटेडचे भागभांडवल ५३ टक्क्य़ांपर्यंत राहील. प्रवर्तक कंपनीच्या निव्वळ अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण हे ३ टक्क्य़ांपर्यंत असून ५,००० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. नव्या बँकेच्या अखत्यारीत ५५,००० कोटी रुपयांचे कर्ज वितरण असेल.
भारतात बँकिंग क्षेत्राच्या वाढीबाबत विश्वास व्यक्त करतानाच आयडीएफसी बँकेचे कार्यकारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजीव लाल यांनी बँक येत्या काही वर्षांत १५ टक्के करोत्तर नफा नोंदवेल, असा विश्वास व्यक्त केला. येत्या पाच वर्षांत बँक १.५० कोटी ग्राहक/खातेदार जोडेल, असेही या वेळी नमूद करण्यात आले. दोन ते चार उत्पादनांद्वारे बँकेच्या बँकिंग सेवेला प्रारंभ होणार असून परिपूर्ण वैयक्तिक तसेच किरकोळ बँकिंग व्यवसाय जानेवारी २०१६ पासून सुरू होईल, असे लाल म्हणाले.
बँकेतील मनुष्यबळ १,२०० असून पैकी २०० कर्मचारी हे आयडीएफसी लिमिटेडमधील असतील, असे बँकेच्या मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख अनिमेश कुमार यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले, तर पहिल्या दिवशी बँकेच्या प्रमुख शहरांमध्ये २३ शाखा असतील; पैकी महाराष्ट्रात – मुंबई व पुण्यात प्रत्येकी एक बँक असेल, अशी माहिती बँकेच्या ‘भारत बँकिंग’ विभागाचे प्रमुख रवी शंकर यांनी दिली.
नव्या बँकेच्या संचालक मंडळावर माजी केंद्रीय गृह सचिव अनिल बैजल, माजी नियंत्रक व महालेखापाल विनोद राय यांच्यासह आयडीएफसी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये, स्वाधार मायक्रोफायनान्सच्या संस्थापिका (एकमेव महिला संचालक) वीणा मानकर यांच्यासह १६ सदस्य आहेत.
दोन दशकांपूर्वी कोटक महिंद्र व येस बँकेच्या रूपाने खासगी बँकिंग क्षेत्रात हालचाल नोंदविली गेली. आर्थिक समावेशकतेच्या प्रक्रियेचा भाग म्हणून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात जाहीर झालेल्या परिपूर्ण बँक व्यवसायासाठी २६ अर्जदारांपैकी केवळ बंधन व आयडीएफसी या दोन कंपन्या जुलै २०१४ मध्ये पात्र ठरल्या. पैकी बंधनचे कार्यारंभ २३ ऑगस्टपासून सुरू झाला आहे.

‘आयडीएफसी’ला निर्देशांकांतून गचांडी!
नव्या बँकेचे पालकत्व असलेल्या भांडवली बाजारात सूचिबद्ध आयडीएफसी लिमिटेडला बाजाराच्या विविध निर्देशांकांतून गचांडी मिळणार आहे. तिची जागा इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स कंपनी घेणार आहे. पायाभूत वित्तपुरवठा क्षेत्रातील प्रमुख कंपनीतून येत्या १ ऑक्टोबरपासून नवीन वाणिज्य बँकेत निर्माण होत असल्याने कंपनीचे हे पाऊल टाकण्यात येत असल्याचे गुरुवारी स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर टीसीएसमध्ये विलीन होत असलेल्या सीएमसीचे बाजारातील व्यवहारही ३० सप्टेंबरपासून बंद होतील

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 5:07 am

Web Title: idfc ready for banking
टॅग : Banking
Next Stories
1 छोटय़ा कारमध्ये मारुतीला स्वस्त व मस्त पर्याय
2 अभियंत्याने उघडले डोळे..फोक्सवॅगन : अशी ही बनवाबनवी
3 मुंबईतील न विकली गेलेली ६९ टक्के घरे कोटीहून अधिक किमतीची : सर्वेक्षण
Just Now!
X