04 June 2020

News Flash

कमावला तरच फायदा..!

शेअर बाजाराची तऱ्हाच वेगळी आहे. येथे आज गुंतलेले १०० रुपये रातोरात दुपटीने वाढून दुसऱ्या दिवशी २०० वर गेलेले दिसतील

| May 30, 2015 07:48 am

शेअर बाजाराची तऱ्हाच वेगळी आहे. येथे आज गुंतलेले १०० रुपये रातोरात दुपटीने वाढून दुसऱ्या दिवशी २०० वर गेलेले दिसतील, तर तिसऱ्या दिवशी पुन्हा शे-सव्वाशेच्या पूर्वपदाला आलेले असतील. फायदा दुपटीवर गेलेला तर दिसला, पण वेळीच कमावला तरच फायदा. ज्या गतीने वर्षभरात फायदा उंचावला, त्याच गतीने कमावलेले सर्व जवळपास नुकसानीला पोहोचले, असा अनुभव सरलेल्या वर्षांने अनेकांना निश्चितच दिला असेल. २८ मे २०१४ ते २९ मे २०१५ असा वर्षवेध घेतल्यास, भारतीय बाजाराचे निर्देशांकांचा परतावा १० टक्क्यांच्या आसपास आहे. साधारण २२,४०० वरून २७,८०० सेन्सेक्स हलला आहे. त्या उलट चीनच्या शांघाय एक्स्चेंज तब्बल १४० टक्क्यांनी वधारला आहे. भारताच्या विकासदराने जरी चिनी अर्थगतीला मात देण्याइतकी ताजी प्रगती दाखविली असली तरी हे घडले आहे. इतकेच नव्हे जपान (४० टक्के), हाँगकाँग (२३ टक्के), जर्मनी (२१.५ टक्के), रशिया (१५ टक्के) आणि इटली (१२.२ टक्के) या देशातील बाजार निर्देशांकांची वाढ भारतातील बाजार निर्देशांकांपेक्षा आजपर्यंत वर्षभरात सरस राहिलेली आहे.
गेल्या वर्षी १५ एप्रिलपासून सेन्सेक्स-निफ्टी या प्रमुख निर्देशांकांनी दिवसागणिक नवनवीन उच्चांक बनविण्याचा क्रम सुरू ठेवलेला आपण पाहिले. तर या वर्षी मे महिना जसा नजीक येऊ लागला तशी बाजाराला उतरती कळा लागली. गेल्या वर्षी निवडणूकपूर्व तेजीने विशेषत: मोदीप्रणीत सत्तापालटाच्या आशेने बाजारात बराच उत्साह भिनविला, तर चालू वर्षांत अपेक्षेप्रमाणे फार काही घडताना दिसत नसल्याच्या निराशेने बाजाराला घेरले. पुरता अपेक्षाभंग नसला तर गेल्या सरकारकडून वारसारूपाने आलेले पूर्वलक्ष्यी करवसुलीचे चऱ्हाट सुरूच राहिले आणि ‘मॅट’सारख्या वादग्रस्त मुद्दय़ाला नाहक ताणून विदेशी गुंतवणूकदारांमध्ये ‘सावध, काहीही बदललेले नाही’ या धारणेला जागा निर्माण झाली.
गेल्या वर्षी याच सुमारास सुरू झालेल्या ‘इंडिया स्टोरी’ची हा अकाली अंत असे पूर्ण धाडसाने म्हणता येणार नाही. तरी ‘भारताविषयीचे मन भरले,’ याची चाहूल प्रासंगिक आकडे देत आहेत. कारणे काही का असेनात, पण गेल्या काही आठवडय़ात विदेशी गुंतवणूकदारांनी भारताच्या भांडवली बाजारावर भर कमी करून, चीन व अन्य उदयोन्मुख बाजारांकडे होरा वळविला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2015 7:48 am

Web Title: if u earn then only profit
Next Stories
1 पुन्हा आशेचे हिंदोळे..
2 विकासात भारत चीनच्या पुढे!
3 ‘मेक इन इंडिया’वर राजन यांचा हल्लाबोल
Just Now!
X