कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अपघातांच्या प्रश्नावर फारसे कुणाचे लक्ष वेधले गेलेले नाही कारण होणाऱ्या दुखापतींची नोंद होत नाही आणि त्यांचे मोजमापही अचूक होत नाही, ही वस्तुस्थिती असली तरी अलीकडे वाढलेली जागरूकता, माध्यमांचा दबाव आणि कायद्यातील शिक्षेचा जरब याच्या एकत्रित परिणामी परिस्थितीत निश्चितच सुधार होत आहे, असे औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय, महाराष्ट्राचे संचाालक विलास मोरे यांनी सांगितले.
 ‘ओएसएच इंडिया’ हे या प्रश्नावरील देशातील सर्वात मोठय़ा सुरक्षितता सामग्री व तंत्रज्ञानाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मोरे यांच्या हस्ते झाले. देशा-विदेशातून या क्षेत्रातील ७० हून अधिक प्रदर्शक सहभागी झालेल्या ओएसएच इंडियाच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन १६-१७ सप्टेंबर २०१३ रोजी बॉम्बे कन्व्हेन्शन अ‍ॅण्ड एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे करण्यात आले होते.
भारतात गेल्या ६० वर्षांपासून अधिक काळ कामाच्या ठिकाणची सुरक्षितता आणि आरोग्यविषयक कायदे आहेत. परंतु अलीकडच्या काळात अपघात व त्यात दगावलेल्यांची संख्या पाहता कार्यस्थळी सुरक्षिततेबाबतचा हलगर्जीपणा लक्षात येतो आणि भारतात कठोर सुरक्षा दर्जा लागू करण्याची तातडीची गरजही अधोरेखित होते, असे मोरे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.
थेट विदेशी गुंतवणूक अथवा भागीदारीच्या माध्यमातून येणाऱ्या विकसित  राष्ट्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचा कार्यस्थळावरील सुरक्षा मानदंडाबाबत प्राधान्याने आग्रह लक्षात घ्यायला हवा, असे सलग दुसऱ्या वर्षी ओएसएच इंडियाचे आयोजन यूबीएम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक जोजी जॉर्ज यांनी सांगितले. विशेषत: उत्पादन क्षेत्र, तेल-वायू/ऊर्जा, खाणकाम, जड औद्योगिकीकरण, अवजड बांधकाम, रासायनिक विभागातील उद्योगांनी विदेशी गुंतवणूक व भागीदार हवा असल्यास पाश्चिमात्य राष्ट्रातील सुरक्षा मानदंडांची अंमलबजावणी करावी लागेल, असे त्यांनी सुचविले. अ‍ॅन्सेल, ड्रगर, शील्ड्स, आयओएसएच, नेबोश, ब्रिटिश सेफ्टी कौन्सिल अशा आंतरराष्ट्रीय प्रदर्शकांची उपस्थिती लाभलेल्या या उपक्रमाच्या निमित्ताने कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे आयुष्य आणि मालमत्ता सुरक्षित ठेवण्याची कामगिरी करणाऱ्यांना  ‘ओएसएच इंडिया सुरक्षा पुरस्कार २०१३’द्वारे गौरविण्यात आले.