जगभरात सर्वत्र पिण्यायोग्य पाण्याचे वाढते दुर्भिक्ष, जल व्यवस्थापनाची वाढती निकड, हवामान बदल आणि त्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम या समस्यांवर अद्ययावत तंत्रज्ञान आणि त्यावर आधारित उत्तम दर्जाच्या उपाययोजना आणि सेवांकडून उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या तंत्रज्ञानात्मक प्रयत्नांचे आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन ‘इफाट इंडिया २०१६’ या नावाने मुंबई प्रदर्शन संकुल, गोरेगाव पूर्व येथे भरविले गेले आहे. शनिवार सायंकाळपर्यंत हे तीन दिवसांचे प्रदर्शन सुरू असेल.

पाणी प्रदूषण हे भारतातील किमान सार्वत्रिक जागृती असलेले आणि लागू नियमांचे सर्रास उल्लंघन होणारे क्षेत्र आहे. मात्र इफाट इंडियासारखी व्यापार प्रदर्शने ही सांडपाणी व्यवस्थापनासारख्या प्रश्नांबाबत जाणीवजागृती निर्माण करण्यात करण्यास मदत करतात, असे या प्रदर्शनात आयोजनांत सहभाग असलेल्या महाराष्ट्र जल संसाधन नियमन प्राधिकरणाचे सचिव डॉ. सुरेश कुलकर्णी यांनी सांगितले.

आधीच दरडोई पाण्याची उपलब्धता कमी आहे आणि त्यात या उपलब्ध पाण्यापैकी ६० टक्क्य़ांहून अधिक सांडपाणीरूपात वाया जात असेल, तर सांडपाण्याच्या पुनर्वापराच्या उपाययोजना आवश्यकच ठरतात, असे त्यांनी सूचित केले.

या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात इन्नोव्हेशन एक्स्चेंज फोरम स्थापण्यात आले असून त्यात भारतातील शाश्वत पाणी, कचरा आणि जलस्रोत व्यवस्थापन या कळीच्या मुद्दय़ांवर चर्चा, देवाणघेवाण आणि उपाययोजनांवर विविध तंत्रज्ञानात्मक भागीदार, आंतरराष्ट्रीय कंपन्या, पर्यावरण तंत्रज्ञानातील तज्ज्ञ, धोरणकर्ते, प्रशासकीय अधिकारी ऊहापोह करणार आहेत.