इंडिया इन्फोलाइनची गृहवित्त क्षेत्रातील उपकंपनी ‘इंडिया इन्फोलाइन हाऊसिंग फायनान्स (आयआयएचएफएल)’ने आपल्या अपरिवर्तनीय रोख्यांची ‘आयआयएफएल होम बाँड्स’ या नावाने विक्री प्रस्तावित केली आहे. दसादशे १२% दराने परतावा देणाऱ्या या रोख्यांमधील गुंतवणूक ही सहा वर्षांत दुप्पट होण्याची हमी कंपनीने दिली आहे. तर मासिक पर्यायाअंतर्गत परताव्याचा दर हा वार्षिक १२.६८ टक्क्य़ांइतका राहील.
सहा वर्षे कालावधीसाठी या रोख्यांमधील गुंतवणूक ही कुलूपबंद राहणार असली, तरी विक्रीपश्चात या रोख्यांची बीएसई तसेच एनएसई या राष्ट्रीय शेअर बाजारांमध्ये नोंद होणार असल्याने आवश्यक ती तरलताही उपलब्ध असेल. क्रिसिल आणि इक्रा या दोन्ही पतमानांकन संस्थांनी या रोख्यांना ‘ए वन प्लस’ असे अल्पतम जोखीम दर्शविणारे मानांकन बहाल केले आहे.
आयआयएचएफएलने येत्या काळात सोने-तारण कर्जापेक्षा घरांसाठी कर्ज वितरणावर भर देणारे धोरण आखले असून, प्रामुख्याने भर हा महानगरांबाहेरच्या दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीची शहरे आणि निमशहरी भागांवर असेल, असे कंपनीचे अध्यक्ष एस. श्रीधर यांनी स्पष्ट केले. आजच्या घडीला या क्षेत्रातून केवळ ८.३ टक्के घरे ही कर्ज घेऊन खरेदी केली जातात, त्यामुळे गृहवित्ताला वाढीला भरपूर वाव असल्याचे त्यांनी सांगितले. देशभरात फैलावलेल्या इंडिया इन्फोलाइनच्या १५०० शाखा या कामी कंपनीला उपयुक्त ठरतील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.