‘मेक इन महाराष्ट्र’ मोहिमेला चालना देण्याच्या राज्य शासनाच्या प्रयत्नांना राज्यातील सोन्याचे दागिने आणि ज्वेलरी उद्योगाने बळ दिले आहे. या क्षेत्रातील आघाडीची संघटना असलेल्या ‘इंडिया बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशन लिमिटेड’ (आयबीजेए) ने मुंबईनजीक ५०० एकर जागेवर देशातील पहिले पार्क उभारण्याचे निश्चित केले आहे.

याबाबतचा औपचारिक समारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री प्रकाश मेहता यांच्या उपस्थितीत नुकताच मुंबईत पार पडला.
आयबीजेएचे अध्यक्ष मोहित कंभोज हेही यावेळी उपस्थित होते. याबाबत त्यांनी सांगितले की, या उद्योगामार्फत परदेशी चलनाची सर्वाधिक उलाढाल होते आणि कुशल व अकुशल कामगारांना सर्वाधिक रोजगारही या क्षेत्रामार्फत उपलब्ध करून दिला जातो. हा उद्योग देशाच्या खजिन्यात महत्वपूर्ण योगदान देत राहिला आहे. नव्या उपक्रमामुळे या क्षेत्राला एक फार मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उपक्रमाअंतर्गत ‘आयबीजेए ज्वेलरी अँड नॉलेज पार्क’ची उभारणी करत असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. यामध्ये प्रशिक्षण संस्था, संशोधन केंद्र, प्रदर्शन आणि परिषद केंद्र, निवास, वसतिगृहे, शाळा, रुग्णालये आदींचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले. यानिमित्ताने आयबीजेएने ‘मेक इन इंडिया फॉर जेम्स अँड ज्वेलरी सेक्टर’, ‘मेक इन महाराष्ट्र’, ‘फिल्ड डेव्हलपमेंट इनिशिएटीव्ह बाय आयबीजेए’ आणि ‘आयबीजेए ज्वेलरी पार्क’ या चार बोधचिन्हाचे प्रकाशित करण्यात आले.