स्वीडिश कंपनीच्या हैदराबादेतील पहिल्या दालनाचे उद्घाटन

नवी दिल्ली : थेट विदेशी गुंतवणुकीद्वारे देशातील विक्री क्षेत्रात (सिंगल बॅ्रण्डेड) व्यवसायास पहिली परवानगी मिळविलेल्या ‘आयकिया’च्या भारतातील व्यवसायाला अखेर पाच वर्षांनंतर सुरुवात झाली. स्वीडनच्या या फर्निचर विक्रेता कंपनीचे पहिले दालन हैदराबादेत गुरुवारी सुरू झाले.

आयकिया समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेस्पर ब्रॉडिन यांच्या प्रमुख उपस्थितीत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे पुत्र आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील माहिती तंत्रज्ञान तसेच वाणिज्य खात्याचे मंत्री के. टी. रामा राव यांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन झाले.

या दालनासाठी १३ एकर जागेवर ४ लाख चौरस फूट बांधकाम करण्यात आले असून, या मार्फत ९५० प्रत्यक्ष, तर १,५०० अप्रत्यक्ष नोकऱ्या उपलब्ध होत आहेत. कंपनीने या दालनासाठी १,००० कोटी रुपयांसह आतापर्यंत ४,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

२०२५ पर्यंत २५ दालने सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केलेल्या आयकियाला २०१३ मध्ये १०,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास परवानगी मिळाली होती. कंपनीचे पहिले दालन २०१७ मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. हैदराबाद येथील दालन १९ जुलै रोजी सुरू करण्याची  कंपनीने घोषणा केली होती.

हैदराबादनंतर नवी मुंबई, बंगळूरु तसेच दिल्ली परिसरात दालने सुरू करून, कंपनी १५,००० कर्मचारी भरती करेल, असेही स्पष्ट करण्यात आले.