भारताची अर्थव्यवस्था पुढील २०१६ आर्थिक वर्षांत ६.५ टक्क्य़ांपेक्षा अधिक दराने प्रगती करेल, तर त्या उलट चीनच्या अर्थगतीचा वेग ६.३ टक्क्य़ांवर मंदावेल, असे भाकीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या आपल्या ताज्या जागतिक आर्थिक कल अहवालात केले आहे. आयएमएफच्या मते पुढच्या वर्षीच जगात सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेली अर्थव्यवस्था म्हणून भारताकडून चीनवर सरशी साधली जाईल. गेल्या आठवडय़ात जागतिक बँकेनेही असे भाकीत वर्तविताना, दोन वर्षांनंतर म्हणजे आर्थिक वर्ष २०१७ मध्ये या फेरबदलाची शक्यता सांगितली होती.
विद्यमान २०१५ आर्थिक वर्षांतील भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर ६.३ टक्क्य़ांचा राहील, जो आधीच्या २०१४ वर्षांतील ५.८ टक्क्य़ांच्या तुलनेत सरस असेल, असा ‘आयएमएफ’चा कयास आहे. तर चीनची अर्थव्यवस्था २०१४ सालातील ७.४ टक्क्य़ांच्या विकासदराच्या स्तरापासून पुढील दोन वर्षांत उत्तरोत्तर घसरत जाण्याचा तिचा अंदाज आहे.
भारताच्या अर्थगतीबाबत कयासात आयएमएफने काहीही बदल केलेला नाही. बाह्य़स्थिती निराशाजनक असली आणि निर्यातीला बळ मिळण्याची शक्यता नसली, तरी तेलाच्या किमती घटल्याने आयातीचा भार हलका होणे आणि देशांतर्गत नवीन मोदी राजवटीच्या महत्त्वाच्या रचनात्मक सुधारणांबद्दलचा पुढाकार या बाबी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सकारात्मक ठरतील, असा आयएमएफच्या अहवालाचा शेरा आहे.

भारताकडून चीनवर मात केली जाईल, परंतु हेही लक्षात ठेवायला हवे, की चीनने दशकभराहून अधिक काळ निरंतर ९-१० टक्क्य़ांचा उच्च दराने विकास साधला आहे आणि भारतापेक्षा ती आजही खूप अधिक मोठी अर्थव्यवस्था आहे. भारतानेही उच्च दराने सातत्यपूर्ण विकासासाठी प्रयत्न करायला हवेत आणि आगामी काळात जागतिक अर्थकारणाच्या वृद्धिप्रवणतेची शक्ती बनायला हवे.’’
’  नागेश कुमार
संयुक्त राष्ट्राच्या ‘डब्ल्यूईएसपी’चे दक्षिण व दक्षिण पश्चिम क्षेत्राचे प्रमुख

बाह्य़ चित्र मात्र अर्थनिराशेचे!
खनिज तेलाच्या घटलेल्या किमती जागतिक आर्थिक वृद्धीला मदतकारक ठरणाऱ्या असल्या, तरी त्यापेक्षा अर्थवृद्धीला मारक घटक वरचढ ठरत असल्याचा फटका विकसित व उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांना बसताना दिसेल, असा आयएमएफचा कयास आहे. परिणामी आयएमएफने २०१५ सालासाठी जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचे पूर्वी केलेले भाकीत खालावून ३.५ टक्क्य़ांवर, तर २०१६ सालासाठी ते ३.७ टक्क्य़ांवर घटवले आहे. ऑक्टोबर २०१४ मध्ये करण्यात आलेल्या या भाकितांमध्ये आगामी दोन वर्षांसाठी प्रत्येकी ०.३ टक्क्य़ांची घट करण्यात आली आहे. आयएमएफने भाकितात केलेला सुधार प्रामुख्याने चीन, रशिया, युरोझोन क्षेत्र आणि जपानमधील कमजोर आर्थिक हालचालींच्या परिणामी आहे. त्याचप्रमाणे खनिज तेलाच्या लोळण घेत असलेल्या किमती पाहता काही तेल निर्यातदार देशांच्या अर्थव्यवस्थाही निराशा दर्शवतील, असा तिचा अंदाज आहे.  

आर्थिक उभारी आशादायी
भारताच्या आर्थिक उभारीबाबत सर्वच बडय़ा जागतिक संस्थांकडून उत्साह दर्शविला जात असून, संयुक्त राष्ट्राच्या मंगळवारीच प्रसिद्ध झालेल्या ‘जागतिक आर्थिक परिस्थिती आणि शक्यता (डब्ल्यूईएसपी)’ अहवालानेही विद्यमान २०१५ सालासाठी भारताचा आर्थिक वृद्धीदर ५.९ टक्क्य़ांवर राहण्याचे भाकीत वर्तविले आहे, तर २०१६ साठी संयुक्त राष्ट्राच्या या अहवालाने आयएमएफच्या अंदाजाशी जवळीक साधणाऱ्या ६.३ टक्क्य़ांच्या विकासदराची शक्यता सांगितली आहे.