भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर हा चीनबरोबरीने अन्य उभरत्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत सरस राहील, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफने पुन्हा एकदा व्यक्त केले. विद्यमान २०१५-१६ आर्थिक वर्षांत भारताचा विकासदर ७.५ टक्के राहील, तर चीनबाबतीत तो ६.३ टक्के राहण्याचा आयएमएफचा कयास आहे. लक्षणीय म्हणजे दोन दिवसांपूर्वी जागतिक बँक आणि त्या आधी देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही नेमका हाच अंदाज व्यक्त केला असून, ७.५ टक्क्यांच्या अर्थगतीवर एकमत बनत असल्याचे दिसून येते.  चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था मात्र ७.३ टक्के दराने विकास पावली आहे. तथापि, नव्याने सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि लगोलग प्रकल्प गुंतवणुकीत दिसलेली वाढ आणि आयात कराव्या लागणाऱ्या जिनसांच्या घटलेल्या किमती पाहता भारताला ७.५ टक्के दराने आर्थिक विकास साधणे शक्य असल्याचे निरीक्षण आयएमएफने आपल्या ‘जागतिक आर्थिक दृष्टिक्षेप’ अहवालात नोंदविले आहे. त्या उलट चीनचा आर्थिक विकास दर विद्यमान ६.८ टक्क्यांवरून २०१६ अखेर ६.३ टक्क्यांवर घसरण्याचे भाकीत अहवालाने व्यक्त केले आहे.