जागतिक स्तरावरील भांडवली बाजारात करोना विषाणूजन्य साथीचा कहर रोखण्यासाठी टाळेबंदी पुन्हा लागू केली जाण्याच्या भीतीने डोके वर काढले आणि गुंतवणूकदारांनी दणकून केलेल्या समभाग विक्रीचे पडसाद स्थानिक बाजारातही गुरुवारी उमटले.

सलग १० दिवस सुरू राहिलेल्या आगेकुचीनंतर, भांडवली बाजारात निर्देशांकांनी काहीशी विश्रांती घेणे अपेक्षित असले तरी, गुरुवारी झालेली पडझड ही गुंतवणूकदारांना दणका देणारी ठरली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला ‘सेन्सेक्स’ तब्बल १,०६६.३३ अंशांनी (२.६१ टक्के) गडगडून ४० हजारांखाली ३९,७२८.४१ वर स्थिरावला. बरोबरीने निफ्टी निर्देशांकही २९०.७० अंशांच्या (२.४३ टक्के) घसरणीसह दिवसाचे व्यवहार थंडावले तेव्हा ११,६८०.३५ पातळीवर होता. या मोठय़ा पडझडीने गुंतवणूकदारांच्या सुमारे ३.२५ लाख कोटी रुपयांची संपत्ती चक्काचूर केली.

आधीच्या सलग १० सत्रांमध्ये सेन्सेक्सने २,८२१.३२ अंशांची (६.९१ टक्के) कमाई केली आहे. तर निफ्टीने ७४८.६५ अंशांची (६.२५ टक्के) भर १२ हजारांच्या वेशीपर्यंत मजल मारली होती. दोन्ही निर्देशांकांनी सलगपणे सुरू ठेवलेली दशकभरातील सर्वाधिक लांबलेली घोडदौडीची मालिका होती.

करोना विषाणूजन्य साथीच्या दुसऱ्या लाटेची भीती, तिला थोपवण्यासाठी पुन्हा अर्थव्यवस्थेचा बळी देणारे टाळेबंदी-संचारबंदी यासारखे निर्बंध आणि जगभरचे गुंतवणूकदार आस लावून बसलेल्या अमेरिकेतील अर्थप्रोत्साहक उपायांच्या घोषणा आणि नोव्हेंबरमधील निवडणुकांपूर्वी अंमलबजावणीची शक्यता जवळपास मावळली आहे. अशा सर्व प्रतिकूलतेला, सलग निर्देशांक दौडीने मूल्यवाढ साधलेल्या समभागांची विक्री करून नफा वसूल करण्याच्या प्रवृत्तीची जोड मिळाल्याचा एकत्रित परिणाम गुरुवारच्या मोठय़ा निर्देशांक घसरणीत दिसून आला.

सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ एशियन पेंट्सचा अपवाद करता अन्य सर्व समभाग गडगडले, इतकी पडझडीची व्याप्ती होती. ४.६८ टक्क्य़ांनी घरंगळलेला बजाज फायनान्स हा सर्वाधिक फटका बसलेला समभाग ठरला. सर्व उद्योग क्षेत्रनिहाय निर्देशांक घसरलेच, बीएसई मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशाकांतही प्रमुख निर्देशांकापेक्षा मोठी म्हणजे साडेतीन टक्क्य़ांच्या घरात घसरण दिसून आली.

पडझड कशामुळे?

१. करोना निर्बंधांचा युरोपला वाढता वेढा :

करोना आजार साथीच्या दुसऱ्या लाटेला कसे थोपवावे यासाठी युरोपातील फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन यांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये नव्याने काही निर्बंध आणि टाळेबंदीसारख्या उपायांवर खल सुरू आहे. फ्रान्सने पॅरिससह नऊ प्रमुख शहरांमध्ये शनिवारपासून चार आठवडय़ांसाठी रात्री ९ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. अँजेला मर्केल यांनी जर्मनीतील राज्यांच्या प्रमुखांना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे. याचा गुंतवणूकदारांवर भयकारी परिणाम होऊन युरोपीय बाजारातील प्रमुख निर्देशांकांत अडीच टक्क्यांपर्यंत घसरताना दिसले.

२. आशियाई बाजारांमध्ये विक्रीचा दबाव :

अमेरिका-युरोपमध्ये पुन्हा वाढत्या करोना रुग्णसंख्येने आशियाई गुंतवणूकदारांचाही थरकाप उडविला आहे. स्थानिक बाजार खुले होण्याआधी पहाटेपासून सुरू होणाऱ्या, जपानच्या निक्केई, हाँगकाँगच्या हँगसेंग या निर्देशांकातील गुरुवारच्या दोन टक्क्यांपर्यंतच्या घसरणीने याचा प्रत्यय दिला.

३. भारताची ढासळती आर्थिक स्थिती :

देशांतर्गत ग्राहकांकडून मागणीचा अभाव, उद्योग क्षेत्रात थंडावलेले गुंतवणुकीचे चक्र याला प्रोत्साहन देणाऱ्या उपाययोजनांचा केंद्र सरकारकडून दिसलेला संपूर्ण अभाव, त्याउलट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘दुसरे पॅकेज’ म्हणून अलीकडे ज्या काही घोषणा व सवलती जाहीर केल्या त्याचा परिणाम म्हणून देशाची आर्थिक स्थिती ‘अत्यंत कमजोर’ अशीच राहील, अशी मूडीज् या पतमानांकन संस्थेच्या टिप्पणीने बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावनेला इजा पोहोचविली.