News Flash

व्यापार वृत्त : कर तगाद्याचे नवे सावज ‘मेकमायट्रिप’!

नवी दिल्ली : पर्यटकांचे आदरातिथ्य करणाऱ्या ‘मेकमायट्रिप’ला प्राप्तिकर विभागातर्फे २७.६ कोटी रुपयांची नोटीस पाठविण्यात आली आहे. २००९-१० या आर्थिक वर्षांसाठी पाठविण्यात आलेल्या या नोटिशीला उत्तर

| June 19, 2013 12:01 pm

नवी दिल्ली : पर्यटकांचे आदरातिथ्य करणाऱ्या ‘मेकमायट्रिप’ला प्राप्तिकर विभागातर्फे २७.६ कोटी रुपयांची नोटीस पाठविण्यात आली आहे. २००९-१० या आर्थिक वर्षांसाठी पाठविण्यात आलेल्या या नोटिशीला उत्तर देण्याचे कंपनीने ठरविले आहे. गेल्या महिन्यात याबाबतची नोटीस मिळाल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने मान्य केले आहे. दरम्यान, विभागाची मागणी कंपनीला मान्य नसून त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कंपनीने गेल्या ३० मे रोजीच याबाबत प्राप्तिकर विभागाकडे आपला आक्षेप नोंदविला आहे. कंपनीची देशभरात २० तर दोन आंतरराष्ट्रीय कार्यालये आहेत. अमेरिकेच्या न्यूयॉर्क भांडवली बाजारात कंपनीची नोंदणी आहे.

बँक परवान्यासाठी सज्जता; रेलिगेअर प्रवर्तकांची हिस्सा विक्री
नवी दिल्ली : नवा बँक परवाना प्राप्त करण्याची अट म्हणून रेलिगेअर एन्टरप्राइजेसच्या प्रवर्तकांनी मंगळवारी कंपनीतील आपला हिस्सा ४९ टक्क्यांपर्यंत आणला. मलविंदर आणि शिविंदर या सिंगबंधूंनी कंपनीतील २२.७५ टक्के हिस्सा १,१०० कोटी रुपयांना भांडवली बाजाराच्या माध्यमातून विकला. याप्रकरणी अ‍ॅक्सिस कॅपिटलने सल्लागार संस्थेची भूमिका बजाविली. तिसऱ्या फळीतील बँक परवाने प्राप्त करण्याची प्रक्रिया येत्या महिन्यापासून सुरू होईल. याअंतर्गत इच्छुक कंपन्यांमध्ये प्रवर्तकांचा हिस्सा ४९ टक्क्यांपेक्षा अधिक असता कामा नये, अशी प्रमुख अट आहे. प्रवर्तकांचा कंपनीत सध्या ७१.७५ टक्के हिस्सा होता. बिगरवित्त कंपनी म्हणून रेलिगेअर एन्टरप्राइजेसचे एकूण बाजारमूल्य ४,८०० कोटी रुपयांचे आहे.

अ‍ॅम्वेची भारतात प्रथमच स्वत:ची उत्पादन सुविधा
मदुराई : थेट विक्री क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी अमेरिकी कंपनी अ‍ॅम्वे कॉर्पोरेशनने तामिळनाडूच्या डिंडिगुल जिल्ह्यातील निलाकोट्टई येथे उत्पादन सुविधेसाठी ४९.४ एकर जमिनीचे संपादन केले आहे. पहिल्या टप्प्यात अंदाजे ४०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत उभ्या राहणाऱ्या या प्रकल्पात ४७५ रोजगारांची निर्मिती होणार आहे. आजवर अ‍ॅम्वेच्या भारतीय बाजारपेठेतील उत्पादनांची निर्मिती विविध सात कंत्राटी उत्पादकांमार्फत केली जात होती. २०१५ च्या मध्यावर पूर्ण होणे अपेक्षित असलेल्या तामिळनाडूच्या उत्पादन प्रकल्पातून अ‍ॅम्वेची पोषण, सौंदर्यप्रसाधने आणि मुखनिगा उत्पादनांची निर्मिती होणार आहे.

१०० विक्री दालनांचा टप्पा ‘अरविंद’कडून पार
ठाणे : तयार वस्त्र-प्रावरणांच्या क्षेत्रातील अग्रेसर नाममुद्रा असलेल्या ‘अरविंद’ने ठाण्यात सृष्टी प्लाझा, गोखले रोड, नौपाडा येथे तर डोंबिवली (पूर्व) येथील जगन्नाथ कॉमर्स प्लाझा, मानपाडा रोडवर आपली नवीन दालने सुरू केली आहेत. यूएस पोलो असोसिएशन, फ्लाईंग मशीन, कस्टम टेलरिंग आणि ट्रेस्का यांसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सही या दालनात प्रत्येक वयोगटाच्या आणि आर्थिक वर्गाच्या ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. या नवीन स्टोअर्सच्या माध्यमातून अरविंदने १०० दालनांचा टप्पा पार केला असून, पुढीच पाच वर्षांत देशभरात ४०० अरविंद स्टोअर्सचे कंपनीचे लक्ष्य आहे.

भागविक्रीसाठी इन्टास फार्माचा प्रस्ताव
अहमदाबाद : येथील आघाडीची औषधी क्षेत्रातील इन्टास फार्मास्युटिकल्स लिमिटेडने प्रारंभिक खुल्या भागविक्रीसाठी ‘सेबी’कडे डीआरएचपी प्रस्ताव दाखल केला आहे. जवळपास ६० देशांमध्ये उत्पादनांची वितरण व विक्री होत असलेल्या या कंपनीचा देशांतर्गत बाजार हिस्सा २.५ टक्के इतका आहे. कंपनी १० रु. दर्शनी मूल्याच्या १.६१ कोटी समभागांची विक्री करू इच्छिते आणि या समभागांच्या अधिमूल्यासह विक्रीतून २२५ कोटी रुपयांचे भांडवल उभे राहणे अपेक्षित आहे.

सप्टेंबरमध्ये बांधकाम क्षेत्राचे प्रदर्शन मुंबईत
मुंबई :  उद्योगक्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘फिक्की’, केंद्रीय नगरविकास मंत्रालय आणि डीएमजी इव्हेंन्ट्स यांनी संयुक्तपणे ‘बिग ५ कन्स्ट्रक्ट इंडिया २०१३’ या इमारत निर्माण आणि बांधकामविषयक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन घोषित केले आहे. येत्या २ सप्टेंबर ते ४ सप्टेंबर २०१३ दरम्यान गोरेगावच्या मुंबई प्रदर्शन संकुलात हे प्रदर्शन होत आहे. डीएमजीचे समूह संचालक अँडी व्हाइट यांनी प्रदर्शनविषयक माहिती देताना सांगितले की, आगामी पाच वर्षांत भारतात गृहनिर्माणाची लाटच येऊ घातली आहे. देशातील बांधकामावरील ४३ टक्के खर्च हा या क्षेत्राकडून केला जाणार आहे. या पाश्र्वभूमीवर होत असलेले हे प्रदर्शन विकसक, कंत्राटदार, सेवाप्रदाते, घरइच्छुक जनसामान्य, धोरणकर्ते सर्वासाठी एक आदर्श सामायिक व्यासपीठ ठरेल.

सेंट अँजेलोज्ची ‘आयटी विद्या शिष्यवृत्ती’ योजना
संगणक प्रशिक्षण क्षेत्रात कार्यत सेंट अँजेलोज् प्रोफेशनल एज्युकेशन या संस्थेने ‘आयटी विद्या स्कॉलरशिप २०१३’ योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १० जून २०१३ पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील संस्थेच्या ११ केंद्रांमधून व्यवसायाभिमुख प्रशिक्षण विनामूल्य मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती उपयुक्त ठरेल. इच्छुकांना www.saintangelos.com या वेबस्थळावर जाऊन या योजनेविषयीचा तपशील मिळविता येईल.

कॉसमॉस बँकेच्या ऐरोली आणि सांताक्रूझमध्ये नूतन शाखा
सहकार क्षेत्रात १०७ वर्षांची परंपरा असलेल्या कॉसमॉस बँकेने मुंबईचे उपनगर सांताक्रुझ आणि नवी मुंबईत ऐरोली येथील दोन नवीन शाखांचे गेल्या बुधवारी (१२ जून) एकाच दिवशी उद्घाटन केले. ऐरोली शाखेचे उद्घाटन अखिल भारतीय चार्टर्ड अकाऊंटन्ट संस्थेच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष मंगेश किनरे यांच्या हस्ते, तर सांताक्रुझ येथील शाखेचे कलापूर्ण सुरी आराधना भुवनचे प्रमुख विश्वस्त मणीभाई करसनभाई देढिया यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या दोन्ही प्रसंगी कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, त्याचप्रमाणे बँकेचे संचालक जितेंद्र शहा, अ‍ॅड. प्रल्हाद कोकरे, अरविंद देशपांडे उपस्थित होते. या नवीन शाखा बँकेच्या १२८ आणि १२९ व्या शाखा आहेत. सहा राज्यांमध्ये शाखाविस्तार असलेल्या बँकेने एकूण २२ हजार ६०० कोटींपेक्षा अधिक व्यवसाय साध्य केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 12:01 pm

Web Title: important business news from business world
टॅग : Business News
Next Stories
1 रिझव्‍‌र्ह बँकेचा अपेक्षित सावध पवित्रा!
2 व्यापार तूटीचा विक्रमी कडेलोट!
3 बाजाराला आता वेध ‘फेड’च्या सकारात्मकतेचे!
Just Now!
X