आर्थिक गैरप्रकारावर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून कार्डाद्वारे होणाऱ्या व्यवहारांबाबत सजग राहण्याचे आवाहन रिझव्‍‌र्ह बँकेने अन्य व्यापारी बँकांना केले आहे. क्रेडिट तसेच डेबिट कार्डाद्वारे होणारे आंतरराष्ट्रीय व्यवहारावरील मर्यादांर बँकांनी लक्ष ठेवावे, असेही रिझव्‍‌र्ह बँकने म्हटले आहे.
कार्डाद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या व्यवहारांची मर्यादा सध्या ५०० डॉलर म्हणजेच २५,००० रुपयांपेक्षा अधिक नाही. असे व्यवहार विशेषत: गेल्या अनेक दिवसांमध्ये न वापरले जाणाऱ्या कार्डाद्वारे होत नाही ना, यावर नजर ठेवण्यास बँकांना सांगण्यात आले आहे.
क्रेडिट तसेच डेबिट कार्ड, इंटरनेट, मोबाईल याद्वारे निधी हस्तांतरणाचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. अनेकदा संबंधित बँक ग्राहकांच्या खात्यावर माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अवैधरित्या नियंत्रण मिळविले जाते. संबंधित खातेदारातील मोठी रक्कम परस्पर आपल्या खात्यात वळवून यासाठी एकच व्यक्ती अनेक बँक खात्यांचा वापर करत असल्याचे मुंबईतील एक प्रकरण नुकतेच चर्चेत आले होते.
ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या डेबिट, क्रेडिट कार्डासाठी ग्राहकांना आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी मर्यादा घालून द्यावी, असेही रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे. संबंधित ग्राहकाबद्दलची जोखीम ओळखून बँकांनी याबाबत निर्णय घ्यावा, असेही नमूद करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी ३० जूनपर्यंत करण्यात येणार आहे. अशा कार्डावर व्यवहाराची मर्यादा घालताना ती ५०० डॉलरपेक्षा अधिक नसावी, हेही पाहण्यास बँकांना सांगण्यात आले आहे.