रात्रपाळीत उद्योग चालवा; ऊर्जामंत्र्यांचा आग्रह कायम
राज्यभरातील उद्योगांना स्वस्त दरात किंवा अन्य राज्यांमधील दरांप्रमाणे वीज पुरविणे आर्थिक अडचणींमुळे सरकारला अशक्य आहे. त्यामुळे केवळ विदर्भ व मराठवाडय़ातील उद्योगांचीच वीज दीड ते पावणेदोन रुपये प्रतियुनिटने स्वस्त करण्याचा सरकारचा विचार आहे. उद्योगांनी रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत वीज वापरुन दोन रुपये प्रतियुनिट सवलत मिळवावी, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले असून कोणत्याही उद्योगाने स्वस्त वीज नसल्याने अन्य राज्यांमध्ये स्थलांतरित होण्याचा इशारा दिलेला नसल्याचे स्पष्ट केले.
त्याचबरोबर उद्योजकांनी आपल्या कंपनीतील वीज उपकरणांमध्ये महावितरणच्या निकषांनुसार आवश्यक सुधारणा करुन २६ टक्के सवलत मिळवावी, असेही आवाहन बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. हा पर्याय किंवा रात्रपाळीत उद्योग चालविण्याचा पर्याय स्वीकारला, तर अन्य राज्यांच्याच वीजदरांमध्ये म्हणजे सुमारे साडेपाच रुपये प्रतियुनिटपर्यंत त्यांना वीज मिळेल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
उद्योगांना स्वस्त वीज द्यावी, अशी उद्योजकांची मागणी असून स्टील व अन्य काही उद्योगांनी वीजेच्या दरांच्या प्रश्नामुळे अन्य राज्यांमध्ये जाण्याचा इशारा दिला आहे. वाडा, पालघर येथील उद्योगांचीही तीच समस्या आहे. उद्योग खात्याने राज्यभरातील सर्व उद्योगांना स्वस्त वीज देण्याची मागणी केली आहे. पण विदर्भ व मराठवाडय़ातील उद्योगांनाच स्वस्त वीज देण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये लागतील. पण त्यातून प्रादेशिक वाद वाढणार असल्याने त्याचे राजकीय पडसाद काय उमटतील, याचाही विचार करण्यात येत आहे. त्यामुळे स्वस्त वीज तूर्तास तरी अशक्य दिसत आहे.