देशातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसच्या मॅनजमेंटवर सोमवारी गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळपर्यंत कंपनीच्या शेअर्स १४ टक्क्यांपेक्षा अधिक पडल्याचं पहायला मिळालं. यामुळे गुंतवणुकदारांचं अवघ्या काही मिनिटांमध्ये तब्बल ४५ हजार कोटी रूपयांचे नुकसान झालं.

शुक्रवारी इन्फोसिसचा शेअर ७६७.७५ रुपयांवर बंद झाला होता. तसंच कंपनीचं मार्केट कॅपही जवळपास ३ लाख ३० हजार ७३ कोटी रूपये होते. मंगळवारी कंपनीचे शेअर्स १६ टक्क्यांनी पडले असून ते ६४५.३५ रूपयांव पोहोचलं. त्यानंतर कंपनीची मार्केट कॅपही कमी होऊन ती २ लाख ७७ हजार ४५० कोटी रूपयांवर पोहोचली. दरम्यान, यामुळे गुंतवणुकदारांना तब्बल ५२ हजार कोटी रूपयांचं नुकसान झाल्याचं पहायला मिळालं.

गेल्याच आठवड्यात तिमाही वित्तीय निष्कर्ष जाहीर करणाऱ्या कंपनीच्या ताळेबंदात नफ्याची आकडेवारी फुगविण्यात आली असल्याचा आरोप इन्फोसिसच्या कर्मचाऱ्याने केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाला उद्देशून लिहिलेल्या चार पानी पत्रात संबंधित कर्मचाऱ्याने आपले नाव जाहीर न करता आर्थिक ताळेबंदाच्या गैर व्यवहाराचा आरोप केला आहे. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने गेल्या तिमाहीचा सादर केलेला ताळेबंद चुकीचा असून त्यातील नफ्याची आकडेवारी ही खोटी असल्याचा दावा या कर्मचाऱ्याने याबाबतच्या पत्रात केला आहे.

पत्राखाली नाव न लिहिता कंपनीच्या संचालक मंडळाला हे पत्र रविवारी लिहिण्यात आले आहे. या पत्रामुळे कंपनीचे मुख्य कार्यकारी सलिल पारेख संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून, याबाबतचे म्हणणे लेखा परिक्षण समितीपुढे मांडले असल्याचे स्पष्ट केले आहे. तर पत्रात करण्यात आलेल्या आरोपाबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. व्हेरिझोन, इंटेल, एबीएन एम्रोसारख्याच्या अधिग्रहणाद्वारे झालेले महसुली उत्पादन ताळेबंदात नमूद केले त्याप्रमाणे प्रत्यक्षात नसल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. ताळेबंदात नमूद व्हिसामूल्याबाबतची शंकाही पत्रात उपस्थित करण्यात आली आहे.