दिवाळीच्या मुहूर्ताला शेअर बाजारात चांगली सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शेअर बाजारात व्यवहाराचे विशेष सत्र झाले. बुधवारी संध्याकाळच्या विशेष सत्रात शेअर बाजार ०.७ टक्क्याने वधारला. शेअर बाजाराचा निर्देशांक २४५ अंकांनी वधारुन ३५, २३७ अंकांवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये फक्त ६८ अंकांची भर पडली. निफ्टी १०,६०० अंकांवर बंद झाला. याआधीच्या व्यवहारात निफ्टी १०,५३० अंकांवर बंद झाला होता. वाहन, ग्राहक उपयोगी वस्तू, ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून आली. इन्फेसिसच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी होती.

उद्या गुरुवारी बलिप्रतिपदा असल्याने शेअर बाजार बंद रहाणार असून शुक्रवारी बाजारात पुन्हा व्यवहार सुरु होईल. खनिज तेलाच्या लक्षणीय घसरलेल्या आंतरराष्ट्रीय किमती तसेच डॉलरच्या तुलनेत भरभक्कम होत असलेल्या रुपयामुळे सध्या शेअर बाजार सावरला आहे.