रोख रकमेचा वापर कमी व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांनी कॅशलेस व्हावे, यासाठी आयकर विभागाने नवे पाऊल उचलले आहे. या अंतर्गत दोन लाखांपेक्षा अधिकचे व्यवहार रोख रकमेत करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. ‘दोन लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम एका व्यक्तीकडून दिवसातून एक किंवा अनेक व्यवहारांच्या माध्यमातून घेण्यावर बंदी आहे,’ असे आयकर विभागाने म्हटले आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास दंड आकारण्यात येईल, असा इशारादेखील आयकर विभागाकडून देण्यात आला आहे.

अचल संपत्तीच्या हस्तांतरणासाठी २० हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम रोख रकमेच्या स्वरुपात देण्यावर आणि घेण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय व्यवसायासाठी १० हजार रुपयांपेक्षा अधिक रोकड देण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘रोख रकमेच्या स्वरुपातील व्यवहारांवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड आकारला जाईल. गो कॅशलेस. गो क्लिन,’ असा संदेश आयकर विभागाने जारी केला आहे.

नव्या नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्याबद्दलची माहिती संबंधित परिसरातील आयकर विभागाच्या मुख्य आयुक्तांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी आयकर विभागाने blackmoneyinfo@incometax.gov.in हा ई-मेल आयडी दिला असून त्यावर तक्रार नोंदवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. याआधीही आयकर विभागाकडून अशा जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने २ लाख आणि त्यापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांवर १ एप्रिल २०१७ पासून निर्बंध आणले आहेत. वित्त कायदा २०१७ च्या अंतर्गत सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला.

२ लाख किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचे व्यवहार रोख स्वरुपात करण्यावर आयकर विभागाने बंदी आणली आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला एकाच किंवा एकापेक्षा जास्त व्यवहारांच्या माध्यमातून एकाच दिवसात दोन लाख किंवा त्यापेक्षा अधिकची रक्कम देता किंवा घेता येणार नाही. आयकर कायद्यात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २६९ एसटी कलमांतर्गत या व्यवहारांवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. या नियमाचे उल्लंघन करुन रोख रक्कम स्वीकारणाऱ्या व्यक्तीकडून दंड म्हणून १०० टक्के रक्कम आकारण्यात येणार आहे. आयकर विभागाने जाहिरातीच्या माध्यमातून याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे.