नवी दिल्ली : अद्ययावत प्राप्तीकर विवरणपत्र सुविधा विकासासाठी ४,२४१.९७ कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. या सुविधेमुळे प्राप्तीकर विवरणपत्र प्रक्रियेला लागणारा ६३ दिवसांचा कालावधी अवघ्या एका दिवसावर येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समितीने बुधवारी ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी इन्फोसिसला अधिकार देण्यात आले आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे प्राप्तीकर विवरणपत्राचा कालावधी कमालीने खाली येणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केले.

दिड वर्षांत याबाबतचा प्रकल्प पूर्ण होणार असून तीन महिन्यांच्या चाचणीनंतर त्याची अंमलबजावणी लागू होईल, असेही गोयल यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

एक्झिम बँकेला ६,००० कोटींचे भांडवल

एक्झिम बँकेला ६,००० कोटी रुपयांचे भांडवल देण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला. बँकेच्या व्यवसाय विस्ताराकरिता ही रक्कम उपयोगी पडेल, असे मंत्रिमंडळ बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.