म्युच्युअल फंडांच्या बँकांमधील गुंतवणुकीत विक्रमी वाढ झाली आहे. जून महिन्यात शेअर बाजाराने घेतलेल्या उसळीच्या पाश्र्वभूमीवर गुंतवणुकीचा आकडा ५५ हजार कोटींवर पोहोचला आहे. सेबीकडे आलेल्या अधिकृत आकडेवारीवरून ही बाब पुढे आली आहे.
बँकांच्या समभागातील म्युच्यअल फंडांच्या गुंतवणुकीचा आकडा ३० जून २०१४ अखेर ५४,७४६ कोटींवर पोहोचला आहे. सलग पाचव्या महिन्यात गुंतवणुकीचा हा आकडा चढाच राहिला आहे. बँकिंग क्षेत्रानंतर गुंतवणुकदारांनी सॉफ्टवेअर उद्योगाला पसंती दर्शविली आहे. या क्षेत्रात २६,५९५ कोटी तर ‘फार्मास्युटिकल्स’मध्ये १६८३४ कोटींची गुंतवणूक झाली आहे. वित्तीय कंपन्यांना गुंतवणूकदारांनी चौथ्या क्रमांकाची पसंती दर्शवली आहे. येथे १३,७३६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

घोडदौड कायम
उपलब्ध आकडेवारीनुसार ऑगस्ट २००९ पासून सातत्याने बँकांच्या समभागातील म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीस वाढती पसंती मिळत गेली आहे. त्या वेळी एकूण समभागांच्या विक्रीपैकी तब्बल १२.७३ टक्के समभाग बँकिंग क्षेत्राचे होते. तर ३० जून २०१४ अखेर हीच टक्केवारी २१.५ टक्क्यांवर पोहोचली आहे. बाजारपेठेतील सर्व उपलब्ध समभागांचे एकूण मूल्य २ लाख ५५ हजार कोटी रुपये इतके आहे. चालू वर्षांच्या प्रारंभापासूनच बँकिंग क्षेत्रावर गुंतवणूकदारांच्या उडय़ा पडल्याचे निरीक्षण सेबीच्या आकडेवारीतून पुढे आले आहे. त्यामुळेच जानेवारी २०१४ ते जून २०१४ या कालावधीत बँकिंग क्षेत्रामधील गुंतवणुकीत पाच टक्क्यांनी म्हणजेच तब्बल २४ हजार ४०७ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.