ऑगस्टअखेर सव्वापाच लाख कोटी जमा

चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या पाच महिन्यांमध्ये देशातील अप्रत्यक्ष कर संकलनात २७ टक्के वाढ झाली आहे. तर याच कालावधीत प्रत्यक्ष कर १५ टक्क्य़ांनी वाढले आहे.

एप्रिल ते ऑगस्टमध्ये एकूण अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष कर संकलन वार्षिक तुलनेत ५.२५ लाख कोटी रुपये राहिले आहे. एकूण विद्यमान वित्त वर्षांकरिता राखलेल्या १६.२६ लाख कोटी रुपयांच्या उद्दीष्टामध्ये त्याचा एक तृतियांश हिस्सा राहिला आहे.

चालू आर्थिक वर्षांत सरकारचे प्रत्यक्ष कराचे १२.६४ टक्के (८.४७ लाख कोटी रुपये) तर अप्रत्यक्ष कराचे १०.८ टक्के (७.७९ लाख कोटी रुपये) वाढीव उद्दीष्ट सरकारने निर्धारित केले आहे.

वैयक्तिक कर तसेच उत्पादन शुल्कातील कामगिरीमुळे यंदा प्रत्यक्ष कर १.८९ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. तर एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान अप्रत्यक्ष कर महसूल ३.३६ लाख कोटी रुपये झाले आहे. कंपनी उत्पन्न कर ११.५५ टक्क्य़ांनी वाढले आहे. वैयक्तिक कर गेल्या वर्षीच्या याच कालावधीत २४.०६ टक्क्य़ांनी वाढले होते.

उत्पादन शुल्क ४८.८ टक्क्य़ांनी वाढून एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान १.५३ लाख कोटी रुपये झाले आहे. तर सेवा कर २३.२ टक्क्य़ांनी वाढून ९२,६९६ कोटी रुपये झाले आहे.

चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या पाच महिन्यात सीमाशुल्क ५.७ टक्क्य़ांनी विस्तारत ९०,४४८ कोटी रुपये झाले आहे.