मुंबई : कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांबाबतची चिंता भांडवली बाजारात मंगळवारी पुन्हा उमटली. त्यातच भारतासाठीच्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजित विकास दरातील घसरणीची उतरत्या निर्देशांकात भर पडली.

सेन्सेक्स अर्थात मुंबई निर्देशांक २०५.१० अंश घसरणीसह ४१,३२३.८१ पर्यंत तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा प्रमुख निर्देशांक ५४.७० अंश घसरणीने १२,१६९.८५ वर येऊन थांबला. निफ्टीने सलग तिसरी तर सेन्सेक्सने सलग दुसरी घसरण नोंदविली. व्यापार तणाव निवळण्याच्या दिशेने अमेरिका-चीनची पावले दुसऱ्या टप्प्याकडे वळत असूनही त्याची फारशी दखल भांडवली बाजारात घेतली गेली नाही. उलट कंपन्यांच्या घसरत्या तिमाही वित्तीय निष्कर्षांची तसेच बँकांच्या वाढत्या थकीत कर्जाचे सावटच उमटले.

सेन्सेक्समधील समभाग मूल्य घसरणीत टाटा समूहातील टाटा स्टील सर्वाधिक ३ टक्के घसरणीसह आघाडीवर राहिला. त्याचबरोबर महिंद्र अँड महिंद्र, मारुती सुझुकी, एशियन पेंट्स, पॉवरग्रिड, आयटीसी, अ‍ॅक्सिस बँक आदीही घसरले. अल्ट्राटेक सिमेंट, कोटक महिंद्र बँक, भारती एअरटेल, एचडीएफसी लिमिटेड, इंडसइंड बँक, ओएनजीसी आदी मात्र प्रमुख निर्देशांक घसरूनही वाढले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऊर्जा, स्थावर मालमत्ता, पोलाद, वाहन, बहुपयोगी, बँक, वित्त १.४७ टक्क्यांनी वाढले. तर दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान निर्देशांकात वाढ नोंदली गेली. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप किरकोळ अंशांनी घसरला. तर स्मॉल कॅप स्थिर राहिला.