व्यापारचिन्हांसाठी अर्ज करणाऱ्या ब्रिक्स देशांमध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने म्हटले आहे.
२०१४ च्या आकडेवारीनुसार व्यापारचिन्हासाठी अर्ज करण्यात भारताचा दुसरा क्रमांक आहे. संघटनेने सांगितले की, पेटंट सहकार्य कराराअंतर्गत ८७ टक्के पेटंट ही चीन व अमेरिकेची आहेत. चीननंतर भारताचे १३९४ अर्ज आहेत. रशिया महासंघ (८९०), ब्राझील (५८१) व दक्षिण आफ्रिका (२९७) यांचा क्रमांक नंतर लागतो. असे असले तरी त्यांचे पेटंट दाखल करण्याच्या टक्केवारीतील प्रमाण घटले आहे. ब्राझील ११.६ टक्के, रशिया महासंघ १५.४ टक्के व दक्षिण आफ्रिका १५.५ टक्के इतक्या प्रमाणात पेटंटचे अर्ज करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. भारताचे प्रमाण मात्र ५.६ टक्क्य़ांनी वाढले आहे. २०१४ मध्ये संघटनेकडे २,१५,००० अर्ज आले ती संख्या गेल्या वर्षीपेक्षा ४.५ टक्के अधिक आहे. आंतरराष्ट्रीय पेटंट अर्जाच्या संख्येत झालेली वाढ ही बौद्धिक संपदा हक्काचे महत्त्व अधोरेखित करते व आता पेटंट प्रणाली अर्थव्यवस्थांच्या परिघावरून केंद्रस्थानी आली आहे, असे या संघटनेचे महासंचालक फ्रान्सिस गरी यांनी सांगितले. अमेरिका हा व्यापारचिन्ह नोंदणीत आघाडीवर असून माद्रिद व्यवस्थेनुसार ते नोंदणी करतात. या व्यवस्थेअंतर्गत २०१४ मध्ये ४७,८८५ अर्ज आले असून २०१३ च्या तुलनेत त्यात २.३ टक्के वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलिया (२३.३ टक्के) व ब्रिटन (१९.३ टक्के) यांची अर्ज करण्यातील वाढ २०१४ मध्ये मोठी असून जर्मनी ४.८ टक्के व नेदरलँड्स ४.२ टक्के या देशांची अर्जाची संख्या घटली आहे. चीनच्या हुआवे संस्थेने ३४४२ पेटंट अर्ज केले असून त्यांनी जपानच्या पॅनासॉनिकला २०१४ मध्ये मागे टाकले आहे. अमेरिकेच्या क्वालकॉम कंपनीचे २४०९ अर्ज आहेत. चीनच्या झेडटीई कार्पोरेशनचे २१७९ अर्ज आहेत.