सोन्याचे व्यापारी आणि किरकोळ सराफांनी सोन्याच्या आयातीला र्निबधातून मोकळे करण्याची मागणी करीत येत्या सोमवारी, १० मार्चला देशव्यापी बंदची हाक दिली आहे.
सराफांच्या व्यवसायात अडसर ठरणाऱ्या विविध १० मागण्यांना घेऊन या बंदचे आवाहन करण्यात आले असल्याचे इंडियन बुलियन अ‍ॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मोहित कम्बोज यांनी सांगितले. यामध्ये प्रामुख्याने सोन्याच्या आयातीसंबंधी घालण्यात आलेला ८०:२० र्निबध हटविला जावा, आयात शुल्कात कपात करावी, या दोहोंच्या परिणामी वाढलेल्या सोने तस्करीचा छडा लावताना पोलिसांकडून उलट सराफांवर टाकल्या जाणाऱ्या धाडी बंद व्हाव्यात अशा आपल्या मागण्या असल्याचे कम्बोज यांनी स्पष्ट केले. सराफ व्यवसायाकडे आज शंकेखोर नजरेने पाहिले जात आहे आणि त्यातून देशात विलक्षण रोजगारक्षम असलेल्या या व्यवसायाला अन्यायकारक छळणूक व त्रासाला सामोरे जावे लागणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया कम्बोज यांनी व्यक्त केली.
देशभरातील विविध भागांतून या मोहिमेला मिळत असलेला प्रतिसाद सोमवारचा बंद अत्यंत यशस्वी ठरेल असा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला.