भारतातला किरकोळ महागाईच्या वाढीचा दर मार्च महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये कमी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने घेतलेल्या पोलमध्ये देशभरात टाळेबंदीत शिथिलता आणल्यामुळे महागाईच्या वाढीचा दर कमी झाल्याचे मत नोंदवण्यात आले आहे.

रॉयटर्सनं ३ ते ८ जुलै दरम्यान ३५ अर्थतज्ज्ञांचा पोल घेतला यामध्ये देशातील किरकोळ महागाईचा दर मार्चमधल्या ५.८४ टक्क्यांच्या तुलनेत जूनमध्ये ५.३० टक्के इतका घसरल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अर्थात, भारतीय रिझर्व्ह बँकेने नजीकच्या काळात महागाईच्या वाढीचा दर ४ टक्के राखण्याचे लक्ष्य ठेवले असून ते अद्याप दूरच असल्याचे दिसत आहे.

लॉकडाउनमुळे असलेल्या मर्यादांमुळे एप्रिल व मे मधील महागाईच्या वाढीच्या दराचे आकडे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. परंतु अर्थतज्ज्ञांचा आडाखा ग्राह्य धरल्यास नोव्हेंबरपासून जूनपर्यंतचा काळ विचारात घेतला तर जूनममधला महागाईच्या वाढीचा दर सगळ्यात कमी असण्याची शक्यता आहे.

लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात रुतलेलं अर्थचक्र नंतर रुळावर येण्यास सुरूवात झाल्यामुळे महागाई कमी होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याआधी भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरांमध्ये कपात केली आहे. आता महागाई कमी होत असल्यास रिझर्व्ह बँकेला अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं आणखी दिलासा देणं शक्य होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची सावध भूमिका, चांगला पाऊस व अन्न धान्यांच्या बाबतीत असलेली दिलासादायक स्थिती यामुळे पुढील काही महिन्यांमध्ये महागाई कमी होईल असा अंदाज डीबीएस बँकेच्या अर्थतज्ज्ञ राधिका राव यांनी व्यक्त केला आहे.