29 March 2020

News Flash

संयम महत्त्वाचा

स्टरलाइट टेक्नॉलॉजीने समभाग पुनर्खरेदी प्रस्तावावर विचार करण्यासाठी संचालक मंडळाची २४ मार्च रोजी बैठक बोलावली आहे.

|| सुधीर जोशी

बाजार-साप्ताहिकी

भारतात करोनाची साथ अद्याप नियंत्रणात असली तरी जागतिक घसरणीचे पडसाद भांडवली बाजारावर प्रकर्षांने दिसत आहेत. करोनासारखीच बाजारातही घसरणीची साथ पसरली आहे. बाजाराचे प्रमुख निर्देशांक या आठवडय़ात गेल्या तीन वर्षांतील नीचांकावर आले. सेन्सेक्स ४,१८८ अंश, तर निफ्टी १,२१० अंश  साप्ताहिक घसरणीने बंद झाले.

अशी काही उद्योग क्षेत्रे आहेत ज्यांचा सध्याच्या संकटाशी फारसा थेट संबंध नाही. उदाहरणार्थ विमा कंपन्या, अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्या, दलाली पेढय़ा. लोक आपले विम्याचे हप्ते भरणारच आहेत. म्युच्युअल फंडांमधील थेट अथवा ‘एसआयपी’द्वारे केली जाणाऱ्या गुंतवणुकीतही फार घट झालेली नाही. भांडवली बाजारामधील उलाढालही घटलेली नाही; परंतु या उद्योगांतील एसबीआय लाइफ, एचडीएफसी लाइफ, आयसीआयसीआय लोम्बार्ड, एचडीएफसी एएमसी, मोतीलाल ओसवाल, एडेल्वाइझ यांसारख्या नामवंत व यशस्वी कंपन्यांचे बाजारमूल्य ३० टक्क्यांहून जास्त खाली आले आहे. प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत ही सर्व क्षेत्रे भारतात अजूनही बाल्यावस्थेत आहेत. सामाजिक अंतर वाढवण्याच्या काळात लोक ‘सोशलायझेशन’ विसरणार नाहीत. पर्यायी युनायटेड स्पिरिट्सच्या (ज्याचे समभागही ३० टक्क्य़ांनी खाली आले आहेत.) उत्पादनांची मागणीही फारशी घटणार नाही. गुंतवणुकीसाठी या सर्व चांगल्या संधी आहेत.

स्टरलाइट टेक्नॉलॉजीने समभाग पुनर्खरेदी प्रस्तावावर विचार करण्यासाठी संचालक मंडळाची २४ मार्च रोजी बैठक बोलावली आहे. अर्थसंकल्पात समभाग पुनर्खरेदीवर २० टक्के कर आणला गेला आहे. या प्रस्तावित करामुळे कंपन्यांची समभाग पुनर्खरेदी मंदावेल असा अंदाज होता; परंतु अर्थसंकल्पपश्चात अभूतपूर्व घसरणीमुळे अनेक कंपन्यांच्या समभागांच्या किमती कोसळल्या आहेत. प्रवर्तकांना अपेक्षित असलेल्या वाजवी भावापेक्षा बाजारभाव कमी झाल्याने समभाग पुनर्खरेदीची संधी अनायासे चालून आली आहे. या संधीचा फायदा घेत समभागांची पुनर्खरेदीचे धाडस स्टरलाइट टेक्नॉलॉजीने दाखविले आहे. समभागांच्या किमती घसरत असताना अशा प्रकारच्या धोरणात्मक हालचाली आवश्यक असतात. तेव्हा ही देखील समभागांच्या किमतीतील अस्थिरता कमी करण्याची ही एक रणनीती असू शकेल. नजीकच्या काळात रोकडसुलभता बाळगणाऱ्या कंपन्या समभागांच्या किमतीची घसरण थांबविण्यासाठी अशी धोरणात्मक घोषणा करताना दिसतील. पुनर्खरेदीचे प्रस्तावित भाव लक्षात घेऊन भागधारकांनी निर्णय घेणे उचित.

डाबर या आयुर्वेदिक औषधे व शक्तिवर्धकांच्या उत्पादनांतील एक नामवंत कंपनीने करोना विषाणू फैलावण्याच्या पार्श्वभूमीवरआपले सॅनिटायझर बाजारात आणले आहे. सध्याच्या परिस्थितीत नागरिकांची स्वच्छतेबद्दलची जागरूकता अधिकच वाढली आहे. त्यामुळे दैनंदिन वापराच्या अशा उत्पादनांची तडाखेबंद विक्री होत आहे. विक्रीतील ही वाढ जरी तात्पुरती वाटली तरी लोकांच्या सवयींवर व त्यामुळे या उत्पादनांच्या मागणीवर भारतामध्ये दीर्घकालीन मुदतीमध्ये चांगला परिणाम होईल. हिंदुस्तान युनिलिव्हरने साबणांच्या किमतीमध्ये वाढ केली आहे तसेच घसरलेल्या खनिज तेलाच्या किमतीचाही कंपनीला फायदा होणार आहे. डाबर, हिंदुस्तान युनिलिव्हर, गोदरेज कन्झ्युमरसारख्या कंपन्यांचा ग्रामीण बाजारपेठेवर जम असल्यामुळे घसरलेल्या बाजारात हे समभाग घेण्याची उत्तम संधी आहे.

अर्थव्यवस्था व विविध उद्योगांवरील करोनाचे परिणाम पुढील वर्षभर तरी जाणवत राहतील. त्यामुळे बाजाराला पूर्वपदावर येण्यास काही काळ लागेल. आज केलेल्या गुंतवणुकीचा लगेच फायदाही दिसणार नाही; परंतु साधारण वर्षभरात त्याचे लाभ दिसू लागतील. त्यासाठी संयम महत्त्वाचा.

sudhirjoshi23@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2020 12:51 am

Web Title: india corona viurs effect on the capital market akp 94
Next Stories
1 बांधकाम उद्योगाला भरघोस सवलती हव्यात!
2 अनिल अंबानी यांचा जबाब नोंदविला!
3 मुंबई निर्देशांकाचा घसरणप्रवास सुरूच
Just Now!
X