नवी दिल्ली : रोख चलनाचा कमी वापर करणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत अद्याप या टप्प्यापासून दूरच असल्याचा निर्वाळा ‘आधार’निर्माते नंदन निलेकणी यांनी दिला आहे. तंत्रस्नेही मंचाद्वारे होणाऱ्या पैशाच्या आदान-प्रदानामध्ये सुरक्षिततेचा मुद्दा महत्त्वाचा असून त्याचे निराकरण होऊन हा मार्ग अनुसरायला हवा, असा आग्रहही त्यांनी धरला.

‘आधार’ प्रक्रियेला मूर्त रूप देण्यात सिंहाचा वाटा असलेले नंदन निलेकणी हे रिझव्‍‌र्ह बँकेच्या तंत्रस्नेही देय प्रणालीविषयीच्या समितीचे अध्यक्षही आहेत. सुरक्षा दर्जा परिषदेला संबोधित करताना निलेकणी यांनी रोकडरहित अर्थव्यवस्थेबद्दल भाष्य केले.

एटीएमसारख्या माध्यमातून तंत्रस्नेही मंचावरून पैशाच्या देव-घेवीचे व्यवहार गेल्या काही वर्षांमध्ये वाढल्याचे नमूद करत निलेकणी यांनी अगदी ग्रामीण भागातील अनेक किरकोळ विक्री केंद्रांवरूनही कार्डाचा वापर वाढल्याचे स्पष्ट केले. असे असले तरी अल्प रोकड अर्थव्यवस्था म्हणून अद्याप भारताची ओळख होणे बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले. रोखीने व्यवहार हे सुलभ म्हणून पसंतीचे ठरत असल्याने तसेच त्याद्वारे होणाऱ्या व्यवहाराकरिता कोणतेही अतिरिक्त शुल्क लागत नसल्याने रोकड वापराचे प्रमाण कायम असल्याचेही ते म्हणाले.

तंत्रस्नेही देय माध्यमाच्या सुरक्षिततेबद्दल निलेकणी म्हणाले की, एटीएम देय प्रणालीकरिता उपलब्ध पायाभूत सुविधा अधिक सुरक्षित होणे गरजेचे आहे. रोखीने होणारे व्यवहार कमी करायचे असतील हे नितांत आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. रोकडरहित व्यवहारांचे प्रमाण वाढत असताना कमी सुरक्षिततेचा मुद्दा, कमी गैरव्यवहार, कमी वाद-तक्रार आदींकडेही लक्ष द्यायला हवे, असे त्यांनी सांगितले.

अर्थव्यवस्थेत रोखीने कमी व्यवहार होणे हे आव्हानात्मक असून सुरक्षित तंत्रस्नेही देय मंच आणि त्यासाठी आवश्यक भक्कम पायाभूत सुविधा हे रोखीने होणाऱ्या व्यवहाराकरिता स्पर्धक मानायला हवे, असे निलेकणी यांनी नमूद केले.