‘एनसीएईआर’चे चालू आर्थिक वर्षांसाठी ४.९ टक्क्यांचे भाकीत

नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेविषयी संशोधन व विश्लेषण करणारी संस्था ‘नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉनिक रिसर्च (एनसीएईआर)’ने देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर २०१९-२० सालात ४.९ टक्के राहील, असे शुक्रवारी भाकीत केले. सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय अर्थात एनएसओने त्याचप्रमाणे रिझव्‍‌र्ह बँकेने व्यक्त केलेल्या ५ टक्क्यांच्या पूर्वानुमानापेक्षा विकासदर खाली घसरणार असल्याचे यातून संकेत दिले गेले आहेत.

आगामी २०२०-२१ या आर्थिक वर्षांसाठी मात्र एनसीएईआरने भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ५.६ टक्के  वृद्धीदराचे भाकीत वर्तविले आहे. मागील म्हणजे २०१८-१९ आर्थिक वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ६.१ टक्के असा होता.

एनसीएईआरने शुक्रवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात, चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीसाठी ४.९ टक्के  विकासदराचे, तर चौथ्या तिमाहीसाठी ५.१ टक्के विकासदर राहण्याचे कयास व्यक्त केले आहेत. त्यामुळे २०१९-२० या संपूर्ण वर्षांचा विकासदर ४.९ टक्के  राहील असे तिने स्पष्ट केले आहे. जानेवारी ते मार्च २०२० अशा चौथ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेत काहीशा सुधाराचे कयास खरे ठरले तरच एनसीएईआरने वर्षभरासाठी व्यक्त केलेले ४.९ टक्क्यांचे अनुमानही अचूक ठरेल, असेही यातून दिसून येत आहे.

यंदा काहीसे लांबलेले पर्जन्यमान, त्यामुळे देशभरातील अनेक तलावांतील जलसंचयाची स्थिती उत्तम असून, जी बाब देशाच्या कृषिक्षेत्रात वाढीसाठी उपयुक्त ठरेल, हेच चौथ्या तिमाहीतील अर्थव्यवस्थेतील सुधारणेच्या शक्यतेमागील कारण असल्याचेही या निवेदनातून खुलासेवार स्पष्ट करण्यात आले आहे. किमान मागील वर्षांच्या तुलनेत शेतीतून यंदा उत्पादन वाढण्याची आशा केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

कृषी उत्पादनातील वाढीचा परिणाम हा आगामी काही महिन्यांत चलनवाढीला पायबंद घालणारा ठरेल. गेल्या काही महिन्यांत मुख्यत: कांदे-बटाटे, भाज्या आणि डाळींच्या किमती कडाडल्याचा परिणाम चलनवाढीने चिंताजनक पातळी गाठल्याचे आकडेवारी दर्शविणारे राहिले आहेत.