21 January 2019

News Flash

देशाचा विकास दर ७.५ टक्के राहणार

भारतीय संदर्भ लक्षात घेऊन आपले आर्थिक धोरण आखावे लागेल.

मुंबई शेअर बाजाराच्या सभागृहात सोमवारी झालेल्या पुस्तक प्रकाशन समारंभास सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते.

नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांचा विश्वास

भारतीय संदर्भ लक्षात घेऊन आपले आर्थिक धोरण आखावे लागेल. भारताला २०२२ पर्यंत जगात एक मोठी आर्थिक शक्ती म्हणून नावारूपाला आणण्यासाठी नीती आयोग एक विकास आराखडा तयार करत असून त्यात ८.५ ते ९ टक्के विकास दराचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे जाहीर करत नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी आता देशाची अर्थव्यवस्था प्रगतीच्या वाटेवर असून या वर्षी विकास दर ७.५ टक्के राहील, असा विश्वास सोमवारी व्यक्त केला.

‘सोशियो-इकॉनॉमिक डायनॅमिक्स ऑफ इंडियन सोसायटी : अ हिस्टॉरिकल ओव्हरव्ह्य़ू’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई शेअर बाजाराच्या सभागृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजीव कुमार बोलत होते. विवेक समूह, मुंबई शेअर बाजार व पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संस्था यांच्यातर्फे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले असून अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांनी त्याचे संपादन केले आहे.

मुंबई शेअर बाजाराचे अध्यक्ष एस. रवी, आशीषकुमार चौहान, संजय पानसे, विवेक समूहाचे दिलीप करंबेळकर आदी यावेळी उपस्थित होते.

धोरण लकव्यासह विविध कारणांमुळे काही वर्षांपूर्वी देशाची अर्थव्यवस्था अधोगतीकडे गेली होती. भाजप सरकारने केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे, जीएसटीसारख्या कररचनेमुळे आता आपण अशा अवस्थेला आलो आहोत की देशाची प्रगतीच होईल. ट्रक, सिमेंट, वाहन उद्योग यांची वाढ होत आहे. ईपीएफओचे आकडे पाहिले तर देशात आता दरवर्षी ७० लाख रोजगार निर्माण होत आहेत. त्यामुळे यावर्षी देशाचा विकास दर ७.५ टक्के राहील. आज आपण नवीन भारताच्या निर्माणाचा संकल्प केला तर २०२२ पर्यंत ८.५ ते ९ टक्क्यांनी विकास साधत निश्चितच नवा भारत उदयाला येईल, असा विश्वास राजीव कुमार यांनी व्यक्त केला. रोजगारनिर्मिती होतच नाही या नकारात्मक मानसिकतेतून बाहेर येण्याची गरज आहे. अर्थात रोजगाराजा दर्जा वाढवण्याची गरज आहे व त्याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले.

उज्ज्वला, सौभाग्य, जनधन, आयुष्यमान या सरकारच्या योजनांमुळे देशातील गरीबांना थेट लाभ झाला आहे, असेही राजीवकुमार म्हणाले. सर्वाना सोबत घेऊन विकास साधण्याच्या भाजप सरकारच्या धोरणामुळे यापुढे गतीने विकास होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

First Published on April 17, 2018 2:04 am

Web Title: india gdp rate rajiv kumar vice chairman niti aayog