विक्रमी दरनोंद करणाऱ्या वर्ष २०२० मध्ये प्रत्यक्षात मात्र भारतीयांची सोने मागणी मात्र कमी नोंदवली आहे. करोना-टाळेबंदीच्या वर्षांत देशातील सोने मागणी ३५.३४ टक्क्यांनी कमी होत ४४६.४० टन झाली आहे.

जागतिक सुवर्ण परिषदेच्या दाव्यानुसार, आधीच्या वर्षांत, २०१९ मध्ये भारताची सोने मागणी ६९०.४० टन होती. गेल्या वर्षी सोने दर तोळ्यासाठी प्रथमच ५० हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते.

परिषदेने गुरुवारी मौल्यवान धातूबाबतचा ग्राहक, गुंतवणूकदार, व्यापाऱ्यांचा कल एका अहवालाद्वारे जाहीर केला. भारताप्रमाणे जागतिक स्तरावरही सोने मागणी रोडावली आहे.

मूल्याबाबत सोने मागणी १४ टक्क्यांनी कमी होत १,८८,२८० कोटी रुपये झाली आहे. तर वजनाबाबत एकूण दागिने मागणी ४२ टक्क्यांनी कमी, ३१५.९० टन आहे. मूल्याबाबत त्यात २२.४२ टक्के घसरण आहे.

देशाची सोने आयात ४७ टक्क्यांनी घसरून गेल्या वर्षांत ३४४.२ टन नोंदली गेली आहे. करोना साथ आटोक्यात आल्यानंतर, टाळेबंदी शिथिलतेनंतर शेवटच्या तिमाहीत सोने आयात मात्र १९ टक्क्यांनी वाढल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक पी. आर. सोमसुंदरम यांनी म्हटले आहे.

सोने मागणी दशक तळात

जागतिक स्तरावर सोने मागणीने २०२० मध्ये ११ वर्षांचा तळ नोंदवला. गेल्या वर्षांत सोने मागणी ३,७५९.६० टन नोंदली गेली असून वर्ष २०१९ मधील ४,३८६.४० टनपेक्षा कमी आहे. गेल्या वर्षांत हंगामात, शेवटच्या तिमाहीत मौल्यवान धातूसाठीची मागणी खरेदीदारांकडून कमी नोंदली गेल्याचा परिणाम झाल्याचे परिषदेने म्हटले आहे.