करोनामुळे भारतातील असंघटित क्षेत्रात काम करणारे ४० कोटी लोक रोजगार गमावल्याने ते दारिद्रयाच्या खाईत लोटले जाण्याची भीती आहे, त्याशिवाय या वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत जगभरात १९.५० कोटी पूर्ण वेळाचे रोजगार जाणार असून जगातील कामाचे ६.७ टक्के तास कमी होणार आहेत, असे संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने म्हटले आहे.

‘आयएलओ मॉनिटर सेकंड एडिशन कोविड १९ अँड दी वर्ल्ड ऑफ वर्क’ या अहवालात म्हटले आहे, की करोनाचे दुसऱ्या जागतिक महायुद्धाइतकेच भीषण परिणाम झाले आहेत. कामगार व उद्योगांपुढे संकट असून विकसित व विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांना फटका बसला आहे.

असंघटित क्षेत्रातील लाखो लोकांचे रोजगार जाण्याच्या मार्गावर आहेत. ब्राझील, नायजेरिया, भारत या देशांमध्ये असंघटित क्षेत्रात जास्त लोक काम करतात.

भारतात ९० टक्के लोक असंघटित क्षेत्रात काम करीत असून ४० कोटी लोकांचे रोजगार  जाण्याची शक्यता आहे. भारतात टाळेबंदी लागू असल्याने दारिद्रय़ात वाढ होण्याची शक्यता आहे.

जगात कामाचे तास ६.७ टक्के कमी होणार असून, त्याचाच अर्थ  १९.५० कोटी लोकांच्या नोकऱ्या किंवा रोजगार जाण्याची शक्यता आहे. एक देश कोसळला तर बाकीचे देश कोसळणार हे उघड आहे. त्यामुळे गेल्या ७५ वर्षांंच्या संयुक्त राष्ट्रांच्या इतिहासात प्रथमच मोठय़ा सहकार्याची गरज आहे.

आखाती देशात ८.१ टक्के तासांचे काम घटणार असून ५० लाख पूर्ण वेळ रोजगार जाणार आहेत. युरोपात ७.८ तासांचे काम घटणार असून १.२ कोटी पूर्ण वेळ रोजगार जाणार आहेत. आशिया व पॅसिफिकमध्ये ७.२ टक्के तासांचे काम  घटणार असून १२.५० कोटी पूर्ण वेळ रोजगार संपुष्टात येतील.

भारतातील बेरोजगारीचा ४३ महिन्यांचा विक्रम; मार्चमध्ये ९ टक्के वाढ : ‘सीएमआयई’

करोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरित परिणामांचे अंदाज बांधले जात असतानाच टाळेबंदी लागू झाल्याच्या महिन्यात देशातील बेरोजगारीने गेल्या ४३ महिन्यांचा उच्चांक गाठल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ (सीएमआयई)ने भारतातील बेरोजगारीचा दर मार्च महिन्यात ८.७४ टक्के झाल्याचे म्हटले आहे. हा दर ऑगस्ट २०१६ नंतरचा कमाल दर आहे. निश्चलनीकरणानंतरचा हा सर्वाधिक दर आहे.  संस्थेच्या आकडेवारीनुसार, शहरी भागातील बेरोजगारीचा दर ९.३५ टक्के तर ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर ८.४५ टक्के नोंदला गेला आहे. एप्रिल २०१९ पासून देशातील बेरोजगारीचा दर ८ टक्क्य़ांच्या खाली राहिला आहे. या दरम्यान जुलै व ऑक्टोबरमध्ये त्याने ८ टक्क्य़ांवरील प्रवास नोंदविला होता.

सर्वाधिक बेरोजगारीच्या दराची नोंद उत्तर-पूर्व भागातील त्रिपुरा राज्यात आहे. तेथील बेरोजगाराचा दर मार्चमध्ये २९.९ टक्के नोंदला गेला आहे. तर सर्वात कमी बेरोजगारीचा दर दक्षिणेतील पुडुच्चेरी येथील, १.२ टक्के राहिला आहे. रोजगाराच्या शोधात असलेल्या बेरोजगारांची संख्या मार्चमध्ये ३.७९ कोटी राहिली आहे. हे प्रमाण ऑक्टोबर २०१६ नंतरचे सर्वाधिक आहे. निश्चलनीकरणापूर्वी ३.८५ कोटी बेरोजगार नोकरीच्या शोधात होते.