विवरणपत्र दाखलकर्त्यांमध्ये २२ टक्क्यांनी वाढ

निश्चलनीकरणानंतर देशभरातून ९१ लाख करदाते करांच्या जाळ्यात ओढले गेले असून वैयक्तिक करदात्यांमध्ये प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्यांचे प्रमाण २२ टक्क्यांनी वाढल्याचा सरकारचा दावा आहे.केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर केलेल्या निश्चलनीकरणाच्या निर्णयामुळे रोकडरहित व्यवहारांमध्ये वाढ तर झालीच; मात्र प्राप्तिकरदात्यांच्या कर भरणा व सरकारच्या करसंकलनातही वाढ झाली, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी येथे केला.

निश्चलनीकरणानंतर बँकेमध्ये रक्कम जमा करणाऱ्यांपैकी १७.९२ लाख खातेदारांच्या स्पष्टीकरणाबाबत कर विभागाचे समाधान झाले नसून एक लाख संशयास्पद करचुकवे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती या वेळी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी या वेळी दिली. या खातेदारांची माहिती त्यांच्या प्राप्तीकर विवरणपत्राबरोबर सुसंगत नसल्याचे सांगण्यात आले. तर पैकी ९.७२ लाख जणांनी प्राप्तिकर विभागाने पाठविलेल्या एसएमएस, ई-मेलला प्रतिसाद दिल्याचे ते यावेळी म्हणाले. निश्चलनीकरणानंतर स्रोत नसलेल्या उत्पन्नाची रक्कम १६,३९८ कोटी रुपये असल्याचेही सांगण्यात आले.

करचुकवेगिरी विरोधात संकेतस्थळ

करचुकवेगिरी विरोधातील मोहिमेसाठी केंद्र सरकारने स्वतंत्र संकेतस्थळ तयार केले आहे. ‘ऑपरेशन क्लीन मनी’ या नावाने सादर करण्यात आलेले हे संकेतस्थळ केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने तयार केले आहे. मोठय़ा रकमेच्या बँक ठेवी अथवा खरेदी आदी व्यवहार मंडळाकडून हेरले जाणार असून नव्या संकेतस्थळाच्या माध्यमातून करचुकव्यांवर नजर ठेवली जाऊन कारवाई होणार आहे.