उद्योगक्षेत्राने रोजगाराविषयी नव्या वर्षांचे चित्र अधिक आकर्षक रंगविले आहे. २०१५ मध्ये देशात नव्या १० लाख नोकऱ्या उपलब्ध करून देतानाच कर्मचाऱ्यांना थेट ४० टक्क्यांपर्यंतची वेतनवाढ देण्याचा इरादा जाहीर केला आहे.
अर्थातच कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीवर ४० टक्क्यांपर्यंतची वेतनवाढ सूचित करतानाच ई-कॉमर्ससारख्या माहिती-तंत्रज्ञानाच्या व्यासपीठावरील नवागत क्षेत्रात ती अधिक असेल, असे ‘मायहायरिंग.कॉम’च्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात असे झाल्यास आशियाई क्षेत्रात भारत याबाबत आघाडीवर असेल.
एरवी उद्योगांमध्ये कमाल १० ते १२ टक्क्यांपर्यंत वेतनवाढ दिली जाण्याचा प्रघात असताना खरे दर १५ ते २० टक्के अशी अपेक्षित वेतनवाढदेखील विद्यमान वातावरणात अधिक आहे, असे मत नमूद करताना या सर्वेक्षणात २०१५ मध्ये ९.५० लाखांहून अधिक रोजगार व ४० टक्क्यांपर्यंतची वेतनवाढ अपेक्षित केली आहे.
२०१४ च्या मध्यानंतर देशाचा अर्थ प्रवास पूर्वपदावर येत असतानाच आगामी आर्थिक वर्षांबद्दलही विकास दराचे आकडे ५.५ टक्क्यांपुढे नेले जात आहेत. यामुळे कंपन्याही त्यांच्या विस्तार योजना आखत असून त्यासाठी ही रोजगार व वेतन वाढ आवश्यक असेल, असेही याबाबतच्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला बळ मिळण्याची आशा व्यक्त करत सर्वेक्षणकर्त्यां संकेतस्थळाने अनेक विदेशी कंपन्या भारतात आपले प्रकल्प सुरू करण्याच्या तयारीत आहेत, असेही म्हटले आहे.