नवी दिल्ली :  सण-समारंभाच्या तोंडावर खरेदीदारांकडून वाढलेल्या ग्राहकपयोगी तसेच भांडवली वस्तूच्या मागणीची  शक्यता गृहित धरून देशातील निर्मिती क्षेत्राकडून उत्पादन वाढीचे प्रतिबिंब जुलैमध्ये औद्योगिक उत्पादन दरात उमटलेले दिसून आले. हा दर ६.६ टक्क्यांपुढे गेल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.

वर्षभरापूर्वी, जुलै २०१७ मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक अवघा १ टक्के नोंदला गेला होता. एप्रिल ते जुलै या चालू वित्त वर्षांच्या पहिल्या चार महिन्यात औद्योगिक उत्पादन दर वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील १.७ टक्क्यांवरून थेट ५.४ टक्क्यांवर झेपावला आहे.

यंदाच्या जुलैमध्ये निर्मिती क्षेत्राची वाढ ७ टक्के राहिली आहे. तर ग्राहकपयोगी वस्तू दुहेरी आकडय़ात, १४.४ टक्क्यांनी विस्तारले आहे. भांडवली वस्तूचे उत्पादन ३ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.