वर्षांला ३.४१ लाख कोटी रुपये देशाबाहेर

काळ्या पैशाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक चर्चेत राहिलेला भारत हा देशाबाहेर काळा पैसा पाठविणाऱ्यांच्या यादीत आंतरराष्ट्रीय स्तरावर चौथा मोठा देश ठरला आहे. अमेरिकास्थित ग्लोबल फायनान्शिअल इंटेग्रिटी (जीएफआय) ने याबाबत सादर केलेल्या अहवालात भारतातून २००४ – २०१३ दरम्यान वर्षांला ३.४१ लाख कोटी रुपये (५१.०३ अब्ज डॉलर) कोटी रुपये बाहेर गेले आहेत. ही रक्कम देशाच्या अर्थसंकल्पातील संरक्षणासाठीच्या ५,००० कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे.
देशाबाहेर सर्वाधिक काळा पैसा पाठविणाऱ्यांमध्ये चीन अग्रस्थानी असून या देशातून दरवर्षी १३९ अब्ज डॉलर बाहेर जातात. तर रशिया दुसऱ्या क्रमांकावर असून तेथून १०४ अब्ज डॉलर दरवर्षी देशाबाहेर जातात. मेक्सिकोतून दरवर्षी ५२.८ अब्ज डॉलर्स देशाबाहेर जातात, असे या अहवालात म्हटले आहे.
विविध देशातून मोठय़ा प्रमाणात करचुकवेगिरी करून पैसा बाहेर पाठवला जातो. विकसनशील व उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशातून २०१३ मध्ये १.१ लाख कोटी डॉलर इतका पैसा देशाबाहेर गेला आहे. २००४ ते २०१३ या गेल्या १० वर्षांत ५,१०३ कोटी रुपये भारतातून बाहेर गेले. तर चीनमधून १३९.२३ अब्ज डॉलर, रशियातून १०४.९८ अब्ज डॉलर इतका पैसा बाहेर गेला आहे.
‘इलिसिट फायनान्शियल फ्लोज फ्रॉम डेव्हलपिंग कंट्रीज २००४-२०१३’ या अहवालानुसार काळ्या पैशामुळे विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्था खिळखिळया होत आहेत.
२०११ मध्ये बाहेर जाणारा एकूण काळा पैसा एक लाख कोटी डॉलर होता तर २०१३ मध्ये तो १.१ लाख कोटी डॉलर झाला. २००४ मध्ये बाहेर जाणारा काळा पैसा ४६५.०३ अब्ज डॉलर होता. चीनमधून २०१३ मध्ये २५८.६४ अब्ज डॉलर इतका काळा पैसा एका वर्षांत बाहेर गेला आहे.