देशांतर्गत व निर्यात मागणीत वाढ

नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारपेठ तसेच निर्यातीसाठी मागणी राहिल्याने भारताच्या निर्मिती क्षेत्राने गेल्या सहा महिन्यातील सर्वोत्तम कामगिरी बजाविली आहे. यंदाच्या जूनमध्ये निर्मिती निर्देशांक समाधानकारक ५० अंशांच्या खूप पुढे गेला आहे.

निक्केई निर्मिती खरेदी व्यवस्थापकांचा निर्देशांक गेल्या महिन्यात ५३.१ अंश नोंदला गेला आहे. आधीच्या, मे महिन्यात तो ५१.२ टक्के होता. यंदा तो डिसेंबर २०१७ नंतर प्रथमच वेगाने विस्तारला आहे. यंदा सलग ११ व्या महिन्यात निर्मिती क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. जवळपास वर्षभरात तो ५० अंशांच्या पुढेच राहिला आहे. ५० अंश ही निर्मिती क्षेत्राची समाधानकारक कामगिरी मानली जाते.

निर्मित वस्तूंना भारतातील बाजारपेठ तसेच निर्यातप्रधान देशांकडून मागणी नोंदली गेल्याने यंदा निर्मिती निर्देशांकही उंचावल्याचे हा निर्देशांक तयार करणाऱ्या आयएचएस मार्किटचे अर्थतज्ज्ञ आशना दोढिया यांनी म्हटले आहे. डिसेंबर २०१७ नंतर रोजगाराबाबतही आशादायक चित्र निर्माण झाले आहे, असेही ते म्हणाले.

प्रमुख पायाभूत क्षेत्राची वाढ दहामाहीच्या तळात

देशातील प्रमुख आठ पायाभूत उद्योगांची वाढ १० महिन्यांच्या तळात विसावली आहे. खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्पादन रोडावलेल्याने एकूणच हे क्षेत्र मेमध्ये ३.६ टक्क्य़ांपर्यंत वाढले आहे. वर्षभरापूर्वी ते ३.९ टक्के होते. जुलै २०१७ मधील २.९ टक्के वाढीनंतरचा पायाभूत क्षेत्राचा यंदाचा प्रवास सुमार राहिला आहे. तर महिन्यापूर्वी, एप्रिल २०१८ मध्ये हे क्षेत्र ४.६ टक्क्य़ाने वाढले आहे.

खनिज तेल व नैसर्गिक वायू गटाची वाढ यंदा नकारात्मक, अनुक्रमे २.९ व १.४ टक्के राहिली आहे. तर इंधन शुद्धीकरण उत्पादने, स्टील, ऊर्जा निर्मिती अनुक्रमे ४.९, ०.५ व ३.५ टक्क्य़ांपर्यंत घसरली आहे. कोळसा व खत उत्पादन मात्र वाढून अनुक्रमे १२.१ व ८.४ टक्क्य़ांपर्यंत विस्तारले आहे. चालू वित्त वर्षांच्या पहिल्या दोन महिन्यात, एप्रिल व मेमध्ये प्रमुख आठ क्षेत्राची वाढ ४.१ टक्के झाली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ती ३.३ टक्के होती.

२०१८-१९ करिता अर्थसंकल्पात सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रमाणात ३.३ टक्के वित्तीय तुटीचे लक्ष्य निश्चित केले आहे. मात्र यापेक्षाही कमी यंदाच्या वित्त वर्षांतील वित्तीय तुटीचे प्रमाण असेल. महसूल आणि खर्चातील तफावत असलेली वित्तीय तूट गेल्या आर्थिक वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत ३.५३ टक्के होती. चालू वित्त वर्षांच्या पहिल्या दोन महिन्यात तूट ३.४५ लाख कोटी रुपये राहिली आहे. सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत हे प्रमाण ५५.३ टक्के आहे. चालू आर्थिक वर्षांत वस्तू व सेवा कर संकलन १३ लाख कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे. इ-वे बिलमधील वाढत्या संख्येमुळे ही आशा दिसत आहे.

– पियुष गोयल, अर्थमंत्री.