गेल्या आर्थिक वर्षांत सरकारने राखलेले निर्यातीचे उद्दिष्ट अखेर साध्य करता आलेच नाही. उद्दिष्टापेक्षा ११.५२ टक्के कमी कामगिरी बजावत भारताने २०१४-१५ मध्ये ३१०.५० अब्ज डॉलरची निर्यात केली आहे, तर वार्षिक तुलनेत यंदा १.२३ टक्के कमी निर्यात झाली आहे. गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षांसाठी भारताने निर्यातीचे ३४० अब्ज डॉलरचे लक्ष्य राखले होते. एकूण आर्थिक वर्षांबरोबरच शेवटच्या तिमाहीतील निर्यातही २१.०६ टक्क्यांनी रोडावली आहे. या कालावधीत ती २३.९५ अब्ज डॉलर राहिली आहे. २०१४-१५ मध्ये भारताची आयात मात्र किरकोळ, ०.५९ टक्क्यांनीच कमी झाली आहे. ४४७.५० अब्ज डॉलर आयातीमुळे गेल्या आर्थिक वर्षांतील व्यापारी तूट १३७ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे.
जानेवारी ते मार्च २०१५ या गेल्या आर्थिक वर्षांतील अखेरच्या तिमाहीतील निर्यात १३.४४ टक्क्यांनी कमी होत ती ३५.७४ अब्ज डॉलर झाली आहे. तिमाहीतील व्यापार तूट ११.७९ अब्ज डॉलर आहे. मार्चअखेरच्या तिमाहीत सोने आयात दुप्पट वाढली असून ती ४.९८ अब्ज डॉलर झाली आहे, तर तेल आयात निम्म्याने वाढून ७.४१ अब्ज डॉलर झाली आहे.