भारताने आर्थिक सुधारणांचा वेग वाढवण्याची गरज असून उद्योग सुरू करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करावे, असे नमूद करून अमेरिकेचे उपाध्यक्ष जो बिडेन यांनी बौद्धिक संपदा व मुक्त व्यापार संकेतांचे संरक्षण करण्याची गरजही प्रतिपादित केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून अमेरिकेचा दौरा करणार आहेत.
दोन्ही देशातील पहिली धोरणात्मक व व्यापार संवाद परिषद म्हणजे एका नव्या पर्वाचा प्रारंभ असून आर्थिक वाढीबरोबरच हवामान बदलाच्या मुद्दय़ावरही दोन्ही लोकशाही देशात सहकार्य असणे आवश्यक आहे, असे बिडेन यांनी स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व व्यापार मंत्री निर्मला सीतारामन यांनी या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले. दोन्ही देशातील व्यापार संबंध वृद्धिंगत करताना नियमांचे पालन केले पाहिजे, परराष्ट्र गुंतवणुकीच्या मर्यादा वाढवल्या पाहिजेत. उद्योगांना त्यांची उत्पादने व सेवा विकण्यासाठी अनुकूल वातावरण असले पाहिजे. द्विपक्षीय व्यापारात भारतानेच काही निर्णय घेणे अपेक्षित आहे. तेच दोन्ही देशांच्या हिताचे आहे.
सुषमा स्वराज यांनी सांगितले, की आम्ही शहरीकरणाला चालना देत असून किफायतशीर दरात वीज व घरे उपलब्ध करून देत आहोत. भारत हे जगाचे उत्पादनाचे प्रमुख केंद्र होण्यासाठी प्रयत्नशील आहे. उत्पादन व सेवा आधारित औद्योगिक व प्रशासन मंच डिजिटल इंडियाबरोबर उभे केले जातील. अमेरिकी उद्योगांना भारतात सार्वजनिक व खासगी क्षेत्रात भागीदारीसाठी मोठी संधी आहे. भारताने उद्योगांना अनुकूल वातावरण तयार करण्यास प्राधान्य दिले आहे.