आंतरराष्ट्रीय पतसंस्थांचेही सकारात्मक कयास
फेडरल रिझव्र्हच्या व्याज दरात वाढीतून भांडवली बाजारात संभवणाऱ्या उलथापालथीपासून भारतीय अर्थव्यवस्था पूर्ण अलिप्त राहील अशी शक्यता नसली तरी अनेकांगाने अन्य उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताची स्थिती मजबूत असल्याचे प्रतिपादन ‘फिच’ आणि ‘मूडीज’ दोन बडय़ा आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये व्यक्त केले आहे.
निर्यातीवर मदार तुलनेने कमी असणे आणि खनिज तेलाच्या किमती घसरल्याने बाह्य़ स्थितीची अनुकूलता या दोन बाबी भारतीय अर्थव्यवस्थेच्या पथ्यावर पडणाऱ्या ठरल्या आहेत, असे फिच रेटिंग्जचे संचालक थॉमस रूकमाकर यांनी सांगितले. बरोबरीने देशाच्या आर्थिक वाढीच्या उत्तुंग शक्यता पाहता, विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारत हे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. फिच समूहातील ‘इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च’ने उलट फेडची दरवाढ म्हणजे अमेरिकी अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे चिन्ह असल्याचे सांगत ही बाब उलट भारतीय भांडवली बाजार आणि विदेशी चलन विनिमय व रोख्यांच्या दृष्टीने स्वागतार्हच ठरावे, असे म्हटले आहे. अमेरिकेतील पतधोरणाचा बदललेला कल हा भारताचा अपवाद करता अन्य उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील विदेशी गुंतवणुकीचा निचरा करणारा ठरेल, असा निर्वाळा ‘मूडीज’च्या गुंतवणूकदार सेवा विभागाचे उपाध्यक्ष राहुल घोष यांनी दिला.