पीटीआय, नवी दिल्ली

मुख्यत: इंधनदराच्या तीव्र भडक्याच्या परिणामी घाऊक किंमत निर्देशांकावर आधारीत महागाई दर सरलेल्या ऑक्टोबरमध्ये ५.२८ टक्के नोंदविला गेला. दराचा हा चार महिन्यांचा उच्चांकी स्तर आहे. आधीच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये तो ५.१३ टक्के तर वर्षभरापूर्वी ऑक्टोबर २०१७ मध्ये तो ३.६८ टक्के असा होता.

रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदराचे निर्धारण करताना किरकोळ किमतीवर आधारीत महागाई दर लक्षात घेतलला जातो आणि तो ऑक्टोबरमध्ये ३.३१ टक्के अशा वार्षिक नीचांकी पातळीवर स्थिरावल्याचे दोन दिवसांपूर्वीच दिसून आले आहे. तथापि खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील अस्थिरता आणि त्याचे महागाईपूरक परिणाम पाहता, मध्यवर्ती बँकेला आगामी पतधोरण बैठकीत व्याजदराच्या सध्याच्या पातळीत कोणताही बदल करण्यास वाव नसल्याचे दिसून येते.

बुधवारी सरकारकडून जाहीर केल्या गेलेल्या आकडेवारीनुसार, अन्नधान्य आणि खाद्य वस्तूंच्या किमतीत ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्षात १.४९ टक्क्य़ांनी नरमल्या आहेत. फळे व भाज्याही १८.६५ टक्क्य़ांनी उतरल्या आहेत.

त्या उलट इंधन आणि ऊर्जा या वर्गवारीतील वस्तूंच्या किमतीत ऑक्टोबरमधील १८.६५ टक्क्य़ांची वाढ एकूण महागाई दरात वाढीला कारक ठरली आहे. सप्टेंबरमध्येही या वर्गवारीतील वस्तूंच्या किमती १६.६५ टक्के वधारल्या होत्या.

यातील मुख्यत: पेट्रोल व डिझेलच्या किमती अनुक्रमे १९.८५ टक्के आणि २३.९१ टक्के अशा वाढल्या, तर स्वयंपाकाचा गॅस अर्थात एलपीजीच्या किमती ऑक्टोबरमध्ये तब्बल ३१.३९ टक्के वाढल्या आहेत.