नवी दिल्ली : जागतिक स्तरावर भारतातील इंटरनेट सेवा सर्वात स्वस्त असून देशात प्रति जीबीकरिता ग्राहकांना अवघे १८.५० रुपयेच मोजावे लागत आहे. जागतिक स्तरावर ही किंमत सरासरी प्रति जीबी तब्बल ६०० रुपये आहे.

‘केबलडॉटकोडॉटयूके’ने याबाबत केलेल्या सर्वेक्षणात इंटरनेट वापरकर्त्यां देशांचा हा कल स्पष्ट झाला आहे. याकरिता भारत, अमेरिका, ब्रिटनसह विविध २३० देशांमधील इंटरनेट वापर तपासून पाहण्यात आला.

भारतात इंटरनेटचे मूल्य प्रत्येक जीबीमागे ०.२६ डॉलर तर अमेरिकेत तेच १२.३७ डॉलर आणि ब्रिटनमध्ये ६.६६ डॉलर आहे. याबाबत जागतिक सरासरी ८.५३ डॉलर आहे.

उच्च तंत्रज्ञानाप्रती जागरूक असलेल्या देशातील तरुणांची वाढती संख्या, स्मार्टफोनला धारकांची असलेली अधिक पसंती यामुळे भारतात इंटरनेटचा वापर वाढल्याचे हे सर्वेक्षण म्हणते. त्याचबरोबर स्वस्त इंटरनेट सुविधेमुळेही तिचा वापर वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे.

४३ कोटी स्मार्टफोनसह भारत हा याबाबत चीननंतरचा जगातील दुसरा मोठा देश असल्याचे निरीक्षणही याबाबतच्या अहवालात नोंदविण्यात आले आहे. चीनमध्ये सरासरी दर ९.८९ डॉलर आहे.

इंटरनेटबाबत २३० देशांकडून २३ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर २०१८ दरम्यान ६,३१३ मोबाइल डाटा योजनांच्या माहितीवर ‘केबलडॉटकोडॉटयूके’ने हे सर्वेक्षण केले आहे. भारतातील अभ्यासासाठी विविध कंपन्यांच्या ५७ मोबाइल डाटा योजना तपासण्यात आल्या. पैकी सर्वात कमी योजना ही १.७५ रुपये प्रति जीबी होती. तर सर्वाधिक महागडे इंटरनेट शुल्क ९९.९० रुपये होते. सर्वात महागडी इंटरनेट योजना झिम्बाब्वेमध्ये (प्रति जीबी ७५.२० डॉलर) आहे.

भारताच्या दूरसंचार क्षेत्रात २०१६ मध्ये शिरकाव करणाऱ्या रिलायन्स जिओने इंटरनेट दरांबाबत स्पर्धा निर्माण केली. ४जी सेवा सुरू करतानाच सुरुवातीच्या टप्प्यात मोफत इंटरनेट देऊ केले होते. कंपनीचे आता २८ कोटींहून अधिक मोबाइलग्राहक आहेत.

निम्मी लोकसंख्या इंटरनेटच्या जाळ्यात

मुंबई : कमालीच्या स्वस्त योजना आणि स्मार्टफोनचा सर्वदूर वापर यामुळे देशातील जवळपास निम्मी लोकसंख्या इंटरनेटच्या जाळात आली आहे. वार्षिक १८ टक्के वाढ राखत भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या डिसेंबर २०१८ अखेर ५६.६० कोटींवर पोहोचली आहे. भारतीयांवरील इंटरनेटचा वाढता प्रभाव आपल्या ताज्या अहवालाद्वारे मांडताना ‘कॅन्टर आयएमआरबी’ने २०१९ अखेपर्यंत नेटकरांची संख्या ६२.७० कोटींवर जाईल, असे अंदाजले आहे. भारतात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील इंटरनेटधारकांची संख्याही वेगाने वाढत आहे. एकूण नेटकरांपैकी ८७ टक्के म्हणजेच ४९.३० कोटी भारतीय नियमित इंटरनेट वापरतात.