गुंतवणूक कामगिरीचा वेध घेणारे ‘मॉर्गन स्टॅन्ले’चे टिपण
वित्तीय सल्लागार व नियोजनकारांकडून नाके मुरडल्या जाणाऱ्या, सामान्यांना गुंतवणूक न करण्याचा सल्ला दिल्या जाणाऱ्या बँकांतील मुदत ठेवींनीच सरत्या २०१५ सालात गुंतवणूकदारांना सर्वोत्तम परतावा देणारी कामगिरी केली आहे, असा मॉर्गन स्टॅन्लेने प्रसिद्ध केलेल्या संशोधनात्मक टिपणाचा निष्कर्ष आहे.
या जागतिक वित्तीय सेवा संस्थेच्या मते, २०१५ साल हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या व्यापक अंगाने प्रगतीच्या दृष्टीने चांगले राहिले आहे. सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढ, चलनवाढ नियंत्रण, चालू खात्यावरील तूट आणि वित्तीय संतुलन या मुख्य निकषांवरील चांगली कामगिरी मात्र समभाग गुंतवणुकीवर दमदार परतावा देण्यात प्रतिबिंबित झालेली नाही, असे मॉर्गन स्टॅन्लेचे हे टिपण सांगते. भारताचा आगामी अर्थवृद्धीचा प्रवास हा हळुवार आणि असमान धाटणीच्या उभारीचाच राहील, असा या टिपणाचा कयास आहे.
आधीच्या २०१४ सालात समभाग गुंतवणुकीने (बीएसई १०० निर्देशांकातील) दिलेल्या ३२ टक्क्यांच्या परताव्याच्या तुलनेत, २०१५ सालातील या गुंतवणुकीचा परतावा उणे (-) ६.४ टक्के असा नकारात्मक राहिला असल्याकडे मॉर्गन स्टॅन्लेने या टिपणाद्वारे लक्ष वेधले आहे. उल्लेखनीय म्हणजे गेल्या वर्षी याच सुमारास (केंद्रातील नव्या सरकारच्या परिणामी) सशक्त कामगिरीच्या अपेक्षेने गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह जागा केल्याचे आढळून आले होते. परिणामी, चालू वर्षांत म्युच्युअल फंडाच्या समभागसंलग्न (इक्विटी) योजनांमध्ये नवीन गुंतवणुकीचा ओघ विक्रमी स्तरावर पोहोचल्याचे आढळून आले.
तथापि, समभाग गुंतवणुकीतील नकारात्मक परतावा, नरमलेले सोने व स्थावर मालमत्ता गुंतवणुकीचे क्षेत्र पाहता, बँकांतील मुदत ठेवींनीच गुंतवणूकदारांना तारले. २०१६ सालात प्रवेश करताना या स्थितीत त्वरेने फेरबदल घडण्याची शक्यता नसल्याचे टिपणाने स्पष्ट केले आहे.
मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने गेल्या काही दिवसांत उसळी घेऊन २६,००० ची पातळी पुन्हा गाठली आहे, परंतु तरीही ३१ डिसेंबर २०१४ रोजीच्या २७,४९९ या स्तरापासून तो १५०० अशांनी (-५.४५ टक्के) वर्षभरात घसरला आहे. तरीही देशाच्या अर्थवृद्धीला उपकारक, टिकाऊ, लाभक्षम व्यवसायात असणाऱ्या दर्जेदार समभागांची निवड करून त्यात दीर्घावधीसाठी गुंतवणुकीत राहण्याचा सल्लाही मॉर्गन स्टॅन्लेच्या या टिपणाने दिला आहे.