नवागत पोस्ट बँकेचा ग्राहकांना आकर्षक पर्याय

ठरावीक मर्यादेनंतर रोख व्यवहारानंतर शुल्क तसेच खात्यात किमान रक्कम नसल्यास दंड आकारणी असा प्रघात प्रस्थापित खासगी तसेच सार्वजनिक बँकांमध्ये सुरू झाला असतानाच खात्यात केवळ ५० रुपये असले तरी दंड न आकारणारी बँक लवकरच अस्तित्वात येत आहे. त्याचबरोबर या नवागत बँकेत खाते सुरू करण्यासाठी केवळ २० रुपयांचीच मर्यादा असेल.

देशातील कानाकोपऱ्यात अगदी दुर्गम ग्रामीण भागापर्यंत मोठे जाळे असणाऱ्या टपाल विभागाच्या ‘पोस्ट बँके’ने प्रस्थापितांकडे असलेल्या खातेदारांना आकर्षिण्याची तयारी सुरू आहे. १.५० लाख ठिकाणी अस्तित्व असलेल्या टपाल विभागामार्फत सुरू होणाऱ्या बँकेकडून खातेदारांना अनेक अभिनव सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

२० रुपयांद्वारे पोस्ट बँकेत खाते सुरू करण्याबरोबरच खात्यातील किमान रकमेचा कोणताही दंडक, व्यवहारांसाठी शुल्क अथवा दंड न आकारण्याची तरतूद केली जाणार आहे. तसेच बचत खात्यावर वार्षिक ४ टक्केप्रमाणे व्याजही दिले जाणार आहे. धनादेश सुविधा असलेल्या पोस्ट बँक खातेदारांना मात्र ५०० रुपये शिल्लक बंधनकारक असेल असे समजते. पोस्ट बँकेच्या कार्डधारकांना व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क असणार नाही.

तूर्त देशात १.३० लाख गावांमध्ये टपाल कार्यालये आहेत. त्यापैकी सध्या २३,०९१ टपाल कार्यालये ‘कोअर बँकिंग’ने (सीबीएस) जोडण्यात आली असून ९६८ एटीएम सुरू करण्यात आली आहेत. पोस्ट बँकेचा परिपूर्ण व्यवसाय लवकरच कार्यान्वित होण्याची चिन्हे आहेत.

पेटीएम बँकेचीही महिनाभरात सुरुवात

रिझव्‍‌र्ह बँकेकडून अंतिम परवाना मिळवून पेटीएम पेमेंट्स बँकेचा व्यवसाय १ एप्रिल २०१७ पासून सुरू होईल, अशी माहिती पेटीएमचे संस्थापक व मुख्याधिकारी विजय शेखर शर्मा यांनी मुंबईत एका कार्यक्रमात दिली. कंपनीला जानेवारीमध्ये व्यवसायाची अंतिम परवानगी मिळाली आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेची बँक खाते सुविधा बँकेच्या ग्राहकांकरिता लवकरच सुरू केली जाईल. अन्य बँकांप्रमाणेच पेटीएमची पेमेंट्स बँकेची रचना असेल. स्टेट बँकेचे खातेदार २०.७ कोटी आहेत. तुलनेत सध्या पेटीएमचे २१.५ कोटी वापरकर्ते व त्यांच्यामार्फत महिन्याला २० कोटी व्यवहार होतात, असा शर्मा यांनी दावा केला.