मुंबई : निवासी घरांच्या किमतीत वर्षांगणिक वाढीत ५६ देशांच्या सूचीत भारत तळाला म्हणजे ४७ व्या क्रमांकावर आहे. भारतातील घरांच्या किमतीत सरलेल्या जुलै ते सप्टेंबर तिमाहीत अवघी ०.६ टक्के वाढ हा गेल्या सहा वर्षांतील वाढीचा निम्नतम दर आहे.

एप्रिल ते जून तिमाहीत या आघाडीवर भारताची स्थिती तुलनेने चांगली होती. ७.७ टक्के  वर्षांगणिक वाढीसह, भारताचे जागतिक क्रमवारीत स्थान ११ व्या पायरीवर होते. आंतरराष्ट्रीय मालमत्ताविषयक सल्लागार कंपनी – नाइट फ्रँक इंडियाने प्रसिद्ध केलेल्या ‘ग्लोबल हाऊस प्राइज इंडेक्स’ नावाच्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. २०१९ सालच्या तिसऱ्या तिमाहीचा अहवाल शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला.

एकूण मंदावलेली घरांची विक्री, बांधून तयार परंतु विक्री न झालेली मोठय़ा प्रमाणातील घरे आणि विकासकांना भेडसावत असलेल्या रोकडतरलतेची समस्या या घटकांमुळे घरांच्या किमतीतील वाढीवर मर्यादा आली आहे. तसेच रेरा, वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि बेनामी व्यवहार (प्रतिबंध) सुधारणा कायदा, २०१६ अशा सरकारी नियमनांतील कठोरतेमुळे मालमत्ता बाजारपेठ ही घर खरेदीदारांच्या सोयीची बनल्याने किमतीवर बंधने आली आहेत.