यंदा पाऊसपाणी सकारात्मक राहण्याची अनुकूल भाकीते येऊनही, औद्योगिक क्षेत्रातून अपेक्षित उभारी दिसत नसल्याचे कारण पुढे करीत इंडिया रेटिंग्ज या पतमानांकन संस्थेने भारताचा आर्थिक विकासदर हा चालू वर्षांत आधी अंदाजलेल्या ७.९ टक्क्यांवरून ७.७ टक्के इतका राहील, असा खालावलेला सुधारित अंदाज आपल्या ताज्या टिपणांतून पुढे आणला आहे. सरलेल्या फेब्रुवारीमध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक हा अवघा २.६ टक्के दराने वाढ दर्शवितो, याचा अर्थ उद्योगक्षेत्राची स्थिती अद्याप नाजूकच आहे हेच स्पष्ट करते, असे हे टिपण नमूद करते. मात्र मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडियासारख्या केंद्र सरकारच्या मोहिमांतून अपेक्षित वातावरणनिर्मिती सुरू असून, उद्योग-व्यवसायास सुलभता आणण्याच्या दिशेने आणि जगातील प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून भारताला मानाचे स्थान मिळवून देण्यासही ते उपकारक ठरत असल्याचा शेराही त्याने लगावला आहे.