एप्रिल २०२१ मध्ये निर्देशांक १३४.६ अंश

नवी दिल्ली : करोना वैश्विक साथ प्रसाराच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यातही देशाचे औद्योगिक उत्पादन त्याच्या करोनापूर्व पदानजीक प्रवास करते झाले आहे. अर्थव्यवस्थेचे एक मानक औद्योगिक उत्पादन एप्रिल २०२१ मध्ये १३४.६ अंशांवर पोहोचले आहे.

करोना साथ प्रसारानंतर लागू झालेल्या टाळेबंदीच्या दुसऱ्या महिन्यात, एप्रिल २०२० मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक ५७.३ अंशांनी रोडावले होते. तर त्याआधीच्या वर्षांतील याच कालावधीदरम्यान – एप्रिल २०१९ मध्ये तो १२६.५ अंश होता.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी औद्योगिक उत्पादन निर्देशांकांची काही प्रमाणात आकडेवारी जाहीर केली. सरकारने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही उद्योग क्षेत्राच्या हालचालींचे पूर्ण चित्र स्पष्ट करण्याचे टाळले आहे.

शुक्रवारच्या मोघम आकडेवारीवरून मात्र देशाच्या उद्योग क्षेत्राची सध्याची वाटचाल करोनापूर्व कालावधी समकक्ष असल्याचे काही अंशी दिसते. टाळेबंदीनंतरच्या परिणामांची मात्रा लगेचच येणाऱ्या महिन्यात दिसून आली होती.

सध्याच्या एप्रिलमध्येही साथीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंधांचे सावट राहिले. तरीही निर्मिती, वीज निर्मिती, खनिकर्म आदी क्षेत्रांची कामगिरी लक्षणीय राहिल्याचे शुक्रवारच्या निर्देशांकांतून स्पष्ट झाले.

औद्योगिक उत्पादन दर मोजावयाचा झाल्यास तो फेब्रुवारी २०२० मध्ये ५.२ टक्के होता.