News Flash

सेन्सेक्सचा व्यवहारात ४५ हजारानजीक प्रवास

निफ्टीची सत्रअखेरही नव्या विक्रमाची नोंद; गुंतवणूकदारांचे सावध व्यवहार

निफ्टीची सत्रअखेरही नव्या विक्रमाची नोंद; गुंतवणूकदारांचे सावध व्यवहार

मुंबई : भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक गुरुवारच्या व्यवहारात तेजीनोंद करणारे ठरले. मात्र सत्रअखेर त्यांनी संमिश्र हालचाल नोंदविली. सत्रात ४५ हजारानजीकचा स्तर गाठल्यानंतर मुंबई निर्देशांक बुधवारच्या तुलनेत अवघ्या १४.६१ अंशांचीच वाढ राखू शकला. परिणामी तो ४४,६३२.६५ वर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने मात्र किरकोळ निर्देशांक वाढीनंतरही त्याचा नवा विक्रम गुरुवारी गाठला. प्रमुख निर्देशांक बुधवारच्या तुलनेत २०.१५ अंश वाढीने १३,१३३.९० पर्यंत झेपावला. दोन्ही निर्देशांकातील वाढ ०.१५ टक्क्यापेक्षाही कमी राहिली.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या शुक्रवारी जाहीर होणाऱ्या द्वैमासिक पतधोरण आढावा निर्णयाच्या प्रतीक्षेत गुरुवारी गुंतवणूकदारांनी व्यवहारात तेजीचे वातावरण राखले. सेन्सेक्स सत्रात ४५ हजारानजीक, ४४,९५३.०१ पर्यंत पोहोचला होता. सत्रअखेर मात्र तो या टप्प्यापासून माघारी फिरत किरकोळ वाढीसह बंद झाला.

निफ्टी गुरुवारच्या सत्रात १३,२१६.६० पर्यंत झेपावला. मात्र त्याने दिवसअखेर नव्या विक्रमाची नोंद केली. शुक्रवारी भांडवली बाजाराच्या व्यवहारादरम्यान जाहीर होणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणाच्या निर्णयाची प्रतिक्रिया बाजारावर उमटण्याची शक्यता आहे.

सेन्सेक्समध्ये गुरुवारी मारुतीचे मूल्य सर्वाधिक, ७.४५ टक्क्यांनी वाढले. तसेच ओएनजीसी, एशियन पेंट्स, एनटीपीसी, स्टेट बँक, बजाज फिनसव्‍‌र्ह, टाटा स्टीलही वाढले. तर टीसीएस, बजाज ऑटो, इन्फोसिस, भारती एअरटेल, महिंद्र अँड महिंद्र, एचडीएफसी लिमिटेड १.४८ टक्क्यांपर्यंत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद, बहुपयोगी वस्तू, तेल व वायू, ऊर्जा, वाहन आदी २.५३ टक्क्यांपर्यंत वाढले. तर माहिती तंत्रज्ञान, वित्त व बँक निर्देशांक घसरणीच्या यादीत राहिले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप प्रत्येकी जवळपास एक टक्क्यापर्यंत वाढले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 2:28 am

Web Title: india sensex stock market index sensex trades close to 45000 zws 70
Next Stories
1 जीवन विमा प्रथम हप्ता संकलनात ऑक्टोबरमध्ये ३२ टक्क्य़ांची वाढ
2 प्राथमिक बाजार यंदा सुगीचा!
3 HDFC Bank outages: नवीन क्रेडिट कार्ड व डिजिटल लाँचेस थांबवा, RBI चा एचडीएफसी बँकेला आदेश
Just Now!
X