15 November 2019

News Flash

भारताकडून इराण आणि व्हेनेझुएलातील तेलखरेदी बंद

अमेरिकेने जानेवारीत जारी केलेल्या र्निबधानुसार व्हेनेझुएलातून तेल आयात करण्यास मनाई करण्यात आली आहे.

| May 25, 2019 02:19 am

(संग्रहित छायाचित्र)

वॉशिंग्टन : अमेरिकेने इराणकडून तेल खरेदी करण्यास दिलेल्या सवलतीची मुदत संपल्यानंतर भारताने त्या देशाकडून तेलखरेदी बंद केली आहे, असे भारताचे राजदूत हर्षवर्धन श्रिंगला यांनी सांगितले. अमेरिकेने इराणशी अणुकरार रद्द केल्यानंतर त्यांच्यावर निर्बंध घातले होते, त्याचाच  एक भाग म्हणून चीन व भारतासह इतर देशांनी त्या देशाकडून तेलखरेदी करू नये असे म्हटले होते. भारताने व्हेनेझुएलाकडूनही तेल आयात थांबवली असल्याची माहिती श्रिंगला यांनी दिली आहे.

अमेरिकेने जानेवारीत जारी केलेल्या र्निबधानुसार व्हेनेझुएलातून तेल आयात करण्यास मनाई करण्यात आली आहे. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना पदावरून घालवण्यासाठी अमेरिकेने व्हेनेझुएलाची कोंडी करण्याचे प्रयत्न केले.

इराणशी २०१५ मध्ये केलेला अणुकरार रद्द केल्यानंतर अमेरिकेने इराणकडून तेल खरेदी करण्यास निर्बंध घातले होते. इराण व अमेरिकेसह सहा देशांमध्ये अणुकरार ओबामा यांच्या काळात करण्यात आला होता. इराणची तेल निर्यात शून्य करण्याचा इरादा ट्रम्प प्रशासनाने ठेवला होता.

श्रिंगला यांनी सांगितले, की भारताने इराणकडून तेल  आयात करणे बंद केले आहे. इराणच्या तेलावरचे अवलंबित्व हे २.५ अब्ज टनांवरून १ दशलक्ष टनांपर्यंत खाली आणले आहे. अमेरिकी प्रशासनाचे अग्रक्रम आम्ही समजतो, आम्हाला या र्निबधांमुळे मोठी किंमत मोजावी लागत असली तरी उर्जेसाठी पर्याय शोधावे लागणार आहेत. इराणच नव्हे, तर व्हेनेझुएलाकडून घेतले जाणारे तेलही बंद करण्यात आले आहे. अमेरिकेने तेलाच्या किमतीत स्थिरता येण्याची भाषा केली असली तरी नजीकच्या काळात ते  शक्य वाटत नाही.

भारताबरोबरच ग्रीस, इटली, तैवान, तुर्की यांनी इराणचे तेल आयात करणे बंद केले आहे.

First Published on May 25, 2019 2:19 am

Web Title: india stopped importing oil from iran and venezuela